भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद नजर कैदेत

मुंबई - भीम आर्मीचे संस्थापक एडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी नजरकैद केले आहे. आझाद यांना मालाडमधील एका हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवल्याचा आरोप स्वतः आझाद यांनी केला आहे. 

चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान आझाद यांच्या मुंबईसह महाराष्ट्रात सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. 29 डिसेंबरला त्यांची मुंबईमध्ये जाहीरसभा होणार होती. पण ही सभा होऊ नये, यासाठी आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे.

''महाराष्ट्र ही आमच्यासाठी पूजनीय भूमी आहे आणि भीमा-कोरेगाव आमच्यासाठी तीर्थस्थळ'', असे चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे. एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्रशेखर म्हणाले की, 30 डिसेंबरला भीमा कोरेगाव संघर्ष महासभेसाठी जे स्थळ निश्चित करण्यात आले आहे, तेथेच जाहीर सभा होणार. पण यादरम्यान येथील वातावरण खराब होऊ नये, ही पूर्णतः सरकारची जबाबदारी आहे''. आम्हाला काँग्रेस किंवा भाजपाचं सरकार नकोय. आम्हाला बहुजनांचं सरकार हवे आहे. यासाठी सर्व बहुजन संघटनांनी एकत्र यायला हवे, असं मतंही आझाद यांनी मांडलं आहे. दरम्यान, मजबूत भारत बनवण्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होते. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा, हाच उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितले आहे. बहुजन समाजासाठी भीम आर्मी संघटनेची स्थापना केली आहे. बहुजन समाजाच्या सुरक्षेसाठी आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ही संघटना स्थापण्यात आली आहे, असेही यावेळेस आझाद यांनी सांगितले.

चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्र दौरा -
29 डिसेंबर 2018 - मुंबईत दादर चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार, संध्याकाळी 4 वाजता वरळीतील जांबोरी मैदान येथील महाराष्ट्र भीम आर्मी आयोजित पहिल्या आंबेडकरी जनचेतना सभेला मार्गदर्शन

30 डिसेंबर 2018 - पुण्यातील एसएसपीएमएस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन

31 डिसेंबर 2018 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद आंबेडकरी तरुणाईशी या कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रशेखर आझाद साधणार संवाद साधणार
1 जानेवारी 2019 - भीमा कोरेगावच्या क्रांतीस्तंभास अभिवादन करुन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विजय स्तंभावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
2 जानेवारी 2019 - लातूरमध्ये जाहीर सभा
4 जानेवारी 2019 - अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर जाहीर सभा
Tags