Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महार रेजिमेंटच्या शौर्याची थोर परंपरा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 15 : महार रेजिमेंटला शौर्याची थोर परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत देश रक्षणासाठी महार रेजिमेंटने अतुलनीय शौर्य दाखविले आहे. शौर्याची ही प्रेरणादायी परंपरा नव्या पिढीसमोर यावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने महार रेजिमेंटचा अमृत महोत्सव व शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित केला असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महाराष्ट्रात महार रेजिमेंटचे गौरव स्मृती संग्रहालय उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महार रेजिमेंट अमृत महोत्सव शौर्य पुरस्कारप्राप्त सैनिकांचा गौरव समारंभ गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर,राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर, राहूल नार्वेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अनेक किल्ल्यांची जबाबदारी महार समाजातील शूरवीरांकडे दिली होती. संभाजी महाराजांच्या संरक्षणासाठी महार योद्धे धावून गेले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजांना महार योद्ध्यांची शौर्यगाथा दाखवून महार रेजिमेंटची स्थापना करण्यास भाग पाडले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सैन्य दलासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहिद सैनिकांच्या कुटुंबांना २५ लाख रुपयांची मदत, जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. सैनिकांच्या शौर्याला व त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताच्या भविष्यासाठी त्याचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या गौरव गाथामुळे तरूणांना प्रेरणा मिळेल,असेही फडणवीस म्हणाले.

भामरे म्हणाले, सर्जिकल स्ट्राईकमध्ये महार रेजिमेंटचा सहभाग होता. केंद्र शासनामार्फत माजी सैनिकांसाठी अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

आठवले म्हणाले, शौर्य गाजविणाऱ्या सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्याचा सन्मान मिळाला. जास्तीत जास्त तरुणांनी देशसेवेसाठी सैन्य दलात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बडोले म्हणाले,सध्याच्या नवबौद्ध व पूर्वाश्रमीच्या महार जातीला पराक्रमी इतिहासाची मोठी परंपरा आहे. शौर्यशाली महार रेजिमेंटच्या सैनिकांचे स्मरण करुन त्यांच्याप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. 

यावेळी 51 शौर्य प्राप्त सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते झाला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom