मुंबईला भकास करून विकास केला जाणार नाही - उद्धव ठाकरे

Anonymous

मुंबई - सागरी किनारा महामार्ग व्‍हावा हे माझ्या एकटाचे स्‍वप्‍न नसून हे प्रत्‍येक मुंबईकरांचे स्‍वप्‍न आहे. मुंबईचा विकास करताना कोणावरही अन्याय केला जाणार नाही. मुंबईला भकास करून विकास केला जाणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. बृहन्‍मुंबई महानगरपालिका ‘मुंबई सागरी किनारा महामार्ग प्रकल्‍पाचे भूमिपूजन’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते तसेच मुंबईचे महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज (दि.१६ डिसेंबर २०१८) अमरसन्‍स उद्यान, कंबाला हिल, भुलाबाई देसाई मार्ग, मुंबई येथे पार पडले, त्‍यावेळी आयोजि‍त कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना आजचा हा दिवस आनंद व समाधानाचा असून प्रत्‍येक मुंबईकरांचा आर्शिवाद व ऋणामुळे हे शक्‍य झाले आहे.जगातील जे सर्वोत्‍तम तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान बृहन्‍मुंबई महापालिकेत असले पाहिजे असा माझा तमाम मुंबईकरांच्‍या सेवेसाठी नेहमी अट्टास असतो. तसेच स्‍थानिक भूमिपुत्र असलेल्‍या कोळीबांधवाना कुठेही धक्‍का लागणार नाही, त्‍यांच्‍यावर अन्‍याय होणार नाही, याची काळजी घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.तसेच राज्‍य व केंद्र सरकारने या प्रकल्‍पासाठी विविध परवानगी दिल्‍याबद्दल राज्‍य व केंद्र सरकारला त्‍यांनी यावेळी धन्‍यवाद दिले.त्‍याचप्रमाणे मुंबईचा पूर्व किनारा विकसीत करण्‍यासाठी केंद्र व राज्‍य सरकारने पुढाकार घ्‍यावा , अन्‍यथा महापालिकेला विकसीत करण्‍यासाठी द्यावा अशी कोपरखळी त्‍यांनी यावेळी मारली. सागरी किनारा मार्ग हा टोल फ्री असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगून हे काम निर्धारित वेळेत पूर्ण होऊ दे, अशी ईच्छा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, वाहतूकीच्‍या समस्‍येने तसेच प्रदुषणाने त्रस्‍त असलेल्‍या मुंबईकरांना उत्‍तर म्‍हणून अत्‍यंत दूरदृष्‍टीने हा प्रकल्‍प होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. वातावरणातील कार्बनडाय ऑक्‍साईडचे वाढते प्रमाण तसेच ऑक्‍सीजनची गरज लक्षात घेऊन हरीत पट्टा सुध्‍दा यामध्‍ये राहणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. वेगवान वाहतूकीमुळे इंधन बचत म्‍हणजे पैशाची एकप्रकारे बचत होणार आहे. वातावरणात होणारा बदल तसेच प्रदुषणमुक्‍त मुंबईसाठी हा रस्‍ता होणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. प्रशासनाने अत्‍यंत मेहनत घेऊन या कामाची सुरुवात केली असून कोणावरही अन्‍याय होणार नाही, याची खबरदारी घेणार असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले.

महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, आजचा हा कार्यक्रम ऐतिहासिक असून पारदर्शक पध्‍दतीने या प्रकल्‍पाची अंमलबजावणी करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या प्रकल्‍पामध्‍ये प्रत्‍येक गोष्‍ट नागरिकांसमोर ठेऊन त्यामध्‍ये नागरिकांचा सहभाग घेऊन तसेच प्रत्‍येक वेळी नागरिकांच्‍या सुचना लक्षात घेऊन या प्रकल्‍पाचे आारेखन व मांडणी करण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. निविदा प्रक्रियेची जाहिरात ही आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर प्रसिध्‍द करुन १३ कंपन्‍यांनी यामध्‍ये सहभाग घेतला असल्‍याचे ते म्‍हणाले. या सागरी किनारा महामार्गासाठी बऱयाच प्रकारचे सर्व्‍हेक्षण करण्‍यात आले आहे. तसेच या रस्‍त्‍यामुळे समुद्राच्‍या प्रवाहामध्‍ये काही बदल होईल का ? याचा सुध्‍दा अभ्‍यास करण्‍यात आला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. चार लेनचा हा रस्‍ता असून चार ठिकाणी इंटरचेंज राहणार असल्‍याचे आयुक्‍तांनी सांगितले.या रस्‍त्‍यासाठी वापरण्‍यात येणाऱया मटेरियलसाठी दोन जेट्टीची नव्‍याने उभारणी करण्‍यात येत आहे. समुद्रमार्गेच या संपूर्ण बांधकाम साहित्‍यांची ने – आण करण्‍यात येणार असल्‍याने नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेण्‍यात आली असल्‍याचे महापालिका आयुक्‍तांनी यावेळी सांगितले. या प्रकल्‍पामुळे ९० हेक्‍टर खुली जागा नव्‍याने मिळणार असून ती ग्रिनरी ठेवण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
Tags