Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू

मुंबई, दि. 22 : राज्यात उद्योग क्षेत्रात एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू असून सर्व मार्गांनी गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली. मुंबई शेअर बाजारात आजपासून नवउद्यमींच्या कंपन्यांची (स्टार्ट अप) अधिकृत नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देसाई बोलत होते.

यावेळी देसाई म्हणाले की, स्टार्ट अप क्षेत्रासाठी महाराष्ट्राची भूमी सर्वात पोषक आहे. केंद्र शासनाने जारी केलेल्या आकडेवारीत महाराष्ट्र अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय आयटी क्षेत्रात महाराष्ट्र प्रचंड झेप घेत आहे. शासनाने आयटी क्षेत्रासाठी विशेष धोरण राबविले. त्यामुळे सुमारे 109 आयटी पार्क सुरू झाले असून त्याद्वारे साडेपाच लाख तरुण-तरुणींना नोकरी मिळाली आहे. आयटी क्षेत्रासोबत लघु-मध्यम उद्योगांतून मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यशासन या क्षेत्राला विशेष सवलती देत आहे.

रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार तसेच इतर प्रमुख अर्थविषयक संस्था एकत्र आल्यास येत्या काळात भारत जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून नावारुपास येईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्योगमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हेंचर कॅपटॅलिस्ट, कॉर्नरस्टोन या कंपन्यांचा मुंबई शेअर बाजारासोबत सामज्यंस करार झाला. यावेळी अनुज गोलेजा, अजय ठाकूर, आशिष कुमार, हरिश मेहता, अतुल निसर आदी उपस्थित होते.

मागील सहा वर्षांपासून एसएमई कंपन्यांची मुंबई शेअर बाजारात नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत सातशे कोटी रुपयांचे भांडवल गुंतवल्याची माहिती अजय ठाकूर यांनी दिली. गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध झाल्यास रोजगार निर्मितीसोबत अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी मदत होईल. येत्या काळात आयटी, बायोटेक, थ्रीडी प्रिंग आदी क्षेत्रात मोठी वाढ होणार असून त्यात संधी म्हणून गुंतवणूक करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असा सल्ला हरिष मेहता यांनी दिला.

मुंबई शेअर बाजार सर्व कंपन्यांनासाठी खुले व्यासपीठ असून एसएमईने यात गुंतवणूक केल्यास काही काळात भागभांडवल व नफ्यात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास अतुल निसर यांनी व्यक्त केला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom