महापौर आजपासून राणीबागेत

Anonymous
मुंबई - दादरच्या शिवाजीपार्क येथील महापौर बंगल्यात शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरांना राणीबाग येथील पर्यायी बंगल्यात वास्तव्य असणार आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी भायखळा येथील राणीबागेतल्या बंगल्यात गृहप्रवेश केला. 

मुंबईतील भायखळ्याच्या प्रसिद्ध राणीबागेतील झाडाझुडपात लपलेल्या बंगल्यात आता यापुढे मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचे वास्तव्य असणार आहे. त्यामुळे महापौर बंगल्याचा पत्ता आता दादर नसून भायखळा असणार आहे. सोमवारी या बंगल्यात महापौरांनी गणेशपूजन करून गृहप्रवेश केला. हा बंगला जुना असून ऐतिहासिक वारसा आहे. हा बंगला १९३१ साली बांधण्यात आला. ब्रिटीशांनी मौजेमजेसाठी, पार्टीसाठी या बंगल्याचा वापर कॅफेटेरिया म्हणून केला होता. या उद्देशाने हा बंगला उभारण्यात आला होता. १९७४ पासून हा बंगला महापालिकेतल्या प्रशासकीय अधिका-यांचे निवासस्थान बनला. या बंगल्यात या आधी अतिरिक्त महापालिका आयुक्त असिम गुप्ता यांचे वास्तव्य होते. सद्या इथे महापालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब ज-हाड राहत होते.
Tags