दिल्लीत ३१ जानेवारीला पहिला ‘मूकनायक पुरस्कार’ प्रदान समारंभ

Anonymous
नवी दिल्ली, दि. 23 : पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रथमच ‘मूकनायक पुरस्कार’ देण्यात येत आहे. दिल्लीत 31जानेवारी 2019 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत बडोले यांनी ही माहिती दिली. बडोले म्हणाले, 31 जानेवारी 1920 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरु केले. या घटनेस पुढील वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या वतीने मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना ‘मूकनायक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप -
मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रत्येकी एका पत्रकारास ‘मूकनायक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, या दोन्ही माध्यमातून प्रत्येकी एका पत्रकाराला प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 1 लाख रूपये रोख आणि सन्मानपत्र असे मुख्य पुरस्काराचे तर 51 हजार रूपये आणि सन्मानपत्र असे प्रोत्साहनपर पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी शासनाने निवड समिती गठित केली असून यात पत्रकार आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

बडोले यांनी केली डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी -
प्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृती निर्मितीचे कार्य सुरु आहे. आज बडोले यांनी नोएडा येथे जाऊन प्रतिमा निर्मितीच्या कार्याची पाहणी केली. ही प्रतिकृती 25 फूट उंच आहे. यावेळी सुतार यांच्यासह डॉ. आंबेडकर स्मारक निर्माण कार्यात कार्यरत अभियंतेही उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 14 एप्रिल 2020 पर्यंत डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होणार असल्याचा विश्वासही बडोले यांनी यावेळी व्यक्त केला.