बेस्टचा संप सुरु

  
मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवार मध्य रात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी युनियनच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. मात्र जो अधिकरी चर्चेसाठी बसवला त्याच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने कोणताही तोडगा निघालेला नाही, अशी माहिती बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांनी दिली, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे राव यांनी सांगितले. 

वेतन करार, घरांचा प्रश्न, बेस्ट उपक्रमाचे विलिनीकरण, अशा विविध मागण्यांबाबत सोमवारी महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी कामगार संघटनांना सोमवारी बैठकीला बोलवले होते. मात्र, महाव्यवस्थापकच अनुपस्थित राहिल्याने कोणताही निर्णय झालेला नाही. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेत समाविष्ट करावा, मागणीपत्रावर चर्चा करावी, वेतन करार, निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी, मार्च २०१६ मध्ये वेतन करार संपला तो करार पुन्हा करावा, दिवाळी पूर्वी जाहीर केलेले ५,५०० रुपये सानुग्रह अनुदान, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अशा विविध मागण्या बेस्ट उपक्रमाकडे प्रलंबित आहे. उपक्रमाकडे पाठपुरावा करुनही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी सोमवार मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. 

संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा मेस्मा लावण्याची भीती दाखवत कामगारांवर अन्याय प्रशासन करत आहे. कामगारांना कोणताही संप आनंदाने करायचे नाही. त्यांच्या मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे, हा संपामागचा उद्देश आहे. हा संप १०० टक्के यशस्वी होईल. यामुळे ३,३०० बसेस बंद राहतील असा, इशारा बेस्ट वर्कर्स संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे. 

संप अनधिकृत ओद्योगिक न्यायालयाचा निर्णय
सोमवार मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. संप हा अनधिकृत असून संप करु नये, असा निर्णय ओद्योगिक न्यायालयाने दिला आहे. तसेच संप केलाच तर संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा बेस्ट उपक्रमाने दिला आहे.

एसटी सोडणार जादा गाड्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून मंगळवारी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा गाड्या सोडण्यासाठी एसटी महामंडळाला पत्र दिल्याचे परिवहन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांचा मुंबईकरांना आधार घ्यावा लागणार आहे.

तोडगा काढण्याचे शिवसेनेचे प्रयत्न
बेस्टचा संप टळावा, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत. सोमवारी सकाळपासूनच सभागृह नेत्या विशाखा राऊत, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आयुक्त अजोय मेहता यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेत समाधानकारक तोडगा काढला असून त्याची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सोमवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच संप टाळण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर बेस्ट समिती अध्यक्षांनी संप होणार नाही, याची काळजी घेत असल्याचे सांगितले. येत्या २-३ तासांतच समाधानकारक निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले.

- बेस्ट बसगाड्या ३३०० बंद
- ३० हजार कर्मचारी, चालक, वाहक संपावर
- विद्युत विभागाचे कर्मचारी संपावर जाणार नाहीत
- बेस्ट परिवहनाचा प्रतिदिन तीन कोटी रुपये उत्पन्न
- प्रवासी संख्या २५ लाख
Tags