पालिका रुग्णालयात दारिद्र्य रेषेखालील रुग्णांच्या मोफत रक्त चाचण्या


मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णांना १३९ प्रकराच्या रक्त चाचण्या ५० रुपयांत केल्या जाणार आहेत. तर दारिद्र रेषेखालील नागरिकांच्या चाचण्या मोफत करून मिळणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी मंजूरी दिली. 

मुंबई महापालिकेची ४ प्रमुख, माध्यमिक सेवा अंतर्गत १६ उपनगरीय व ५ विशेष रुग्णालये, प्राथमिक आरोग्य सेवा अंतर्गत १७५ दवाखाने व २८ प्रसूतिगृहे आहेत. पालिकेच्या रुग्णालयात केवळ मुंबईतूनच नव्हे ते राज्याच्या कानाकोपर्‍यातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांच्या आजाराचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्यांवर मोठा खर्च करावा लागतो. यातील ४ रुग्णालयांतील प्रयोगशाळेत विविध मूलभूत आणि प्रगत चाचण्या केल्या जातात. मात्र अनेक चाचण्यांसाठी रुग्णांना खासगी लॅबमधून चाचण्या करून घेण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये खर्च करावे लागतात. या पार्श्वभूमीवर सोयीसाठी केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय आरोग्य मिशन' योजनेंतर्गत ही ‘निदान व सेवा' पुरवली जाणार आहे. त्यानुसार पालिकेच्या रुग्णालयांमध्ये १०१ चाचण्या १०० रुपयांत तर पुढील ३८ अ‍ॅडव्हान्स चाचण्या २०० रुपयांत करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. यावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सर्व चाचण्या मोफत करण्यात याव्यात, अशी सूचना मांडली. मात्र सर्व चाचण्या मोफत दिल्यास गैरफायदा घेतला जाऊ शकतो, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना ही सेवा मोफत द्यावी आणि इतर रुग्णांकडून ५० रुपयांचे शुल्क आकारावे, अशी उपसूचना भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी मांडली. या उपसूचनेला शिवसेनेचे मंगेश सातमकर, राजूल पटेल यांनी पाठिंबा दिला. यानंतर बहुमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्तावाला मंजूरी दिली.

असा होणार खर्च - - या उपक्रमासाठी शहर आणि उपनगरांसाठी थायरोकेअर आणि मेट्रोपॉलिस या प्रयोगशाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये चार वर्षांच्या कंत्राटासाठी पूर्व उनगरात मेट्रो पॉलिस हेल्थ केअर लिमिटेड काम करणार असून यासाठी २६.८६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये ८ उपनगरीय रुग्णालये, ४७दवाखाने आणि १० प्रसूतिगृहांत ही सेवा मिळेल.
- पश्चिम उपनगरांत थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड काम करणार असून चार वर्षांसाठी २९.१४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये ८ उपनगरीय रुग्णालये, ५८ दवाखाने आणि १३ प्रसूतिगृहांत ही सुविधा मिळेल.
- तर शहर विभागासाठी थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड काम करणार असून चार वर्षांसाठी २३.१८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये ५ विशेष रुग्णालये, ७० दवाखाने आणि १० प्रसूतिगृहांत ही सुविधा मिळेल.
Tags