विरोधकांच्या विरोधानंतरही कार्डियाक रुग्णवाहिकेचा प्रस्ताव मंजूर


मुंबई - खासगी कंत्राटदारांकडून पालिका रुग्णालयात कार्डियाक रुग्णवाहिका भाड्याने घेण्यास विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेने प्रस्ताव रेटून नेला. यावेळी प्रस्तावावर मतदान घेतले असता भाजपसमर्थक अपक्ष गीता गवळी सभागृहाबाहेर निघून गेल्याने शिवसेनेने बहुमताने प्रस्ताव मंजूर केला. भाजपने याविरोधात संताप व्यक्त करीत सभात्याग केला.

महापालिकेच्या केईएम, नायर, लोकमान्य टिळक रुग्णालय, कुपर, ट्रामा केअर, बोरीवलीतील कस्तूरबा रुग्णालय आणि भायखळा येथील कस्तूरबा हॉस्पिटल रुग्णालयात 9 कोटी 96 लाख 69 हजार 893 रुपये खर्च करुन खासगी कंत्राटदारांकडून भाडेतत्वावर 23 रुग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आणला. भाजपने यावर हरकत घेत जोरदार विरोध केला. मुंबईत 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुरु आहेत. मग खासगी रुग्णवाहिकांकडून रुग्णवाहिका घेण्याची गरज काय, कंत्राटदारांच्या फायद्यासाठी रुग्णवाहिका खरेदी केल्या जात आहेत का, असा प्रश्न भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी शिंदेच्या मुद्द्याचे समर्थन करुन प्रशासनाची कोंडी केली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या प्रस्तावावर तोडगा काढण्यासाठी मतदान घेतले. याचवेळी भाजपसमर्थक अपक्ष नगरसेविका गीता गवळी सभागृहाबाहेर गेल्याने प्रस्तावावर समान मतदान झाले. अध्यक्षांनी शिवसेनेला मतदान केल्याने बहुमताने प्रस्ताव मंजूर झाला.
Tags