काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोमवारपासून कोकणात !

Anonymous

मुंबई - काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सोमवार 21 जानेवारीपासून कोकण विभागात सुरु होणार आहे. या यात्रेचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण करणार असून यात्रेत काँग्रेसचे मोठे नेते सहभागी होणार आहेत.

जनसंघर्ष यात्रेचा हा सहावा टप्पा असून यापूर्वी पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागाचे पाच टप्पे जनतेच्या प्रचंड प्रतिसादासह पूर्ण झाले आहेत. सोमवार दि. 21 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे जाहीर सभेने जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या टप्प्याचा प्रारंभ होईल. मंगळवार 22 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता कुडाळ येथे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत होणार असून 10. 45 वाजता कणकवली येथे जाहीर सभा होणार आहे. दुपारी 2.15 वाजता राजापूर येथे जाहीर सभा होणार असून सायंकाळी 6.15 वाजता चिपळूण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. बुधवार 23 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वा. खेड येथे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत होणार असून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी 11.45 वाजता पोलादपूर येथे यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून दुपारी 1 वाजता महाड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजता अलिबाग येथे जाहीर सभा होणार आहे.

गुरुवार 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. पेण जि. रायगड येथे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत होणार असून जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 3.15 वाजता पनवेल येथे, 4 वाजता तळोजा येथे व 4.45 वाजता दहिसर मोरी येथे जनसंघर्ष यात्रेचे भव्य स्वागत होणार असून सायंकाळी 6 वाजता कल्याण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार 25 जानेवारी सकाळी 11 वाजता ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात, दुपारी 2 वाजता माजीवाडा विधानसभा क्षेत्रात जाहीर सभा होणार असून दुपारी 4.30 वाजता भिवंडी शहरात विशाल जाहीर सभेने जनसंघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.