चेंबूर, गोवंडी परिसरात ८ व ९ जानेवारीला पाणी पुरवठा खंडित


मुंबई - एम पूर्व विभागामधील तुर्भे जलाशयाचे जलवाहिनीवरील झडपामधून गळती होत असल्याने या झडपा बदलल्या जाणार आहेत. हे काम येत्या मंगळवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी व बुधवारी चेंबूर व गोवंडी मानखुर्द परिसरातील पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे. तर १० जानेवारीला येथील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे पालिकेच्या जलविभागातून सांगण्यात आले. 

जलवाहिनीवरील सदर काम बुधवारी ९ जानेवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण होईल. सदर काम पूर्ण करण्यासाठी २४ तासांचा सलग कालावधी अपेक्षित आहे. या कामामुळे चेंबूर कॅम्प, इंदिरा नगर व आसपासचा परिसर, अजिज बाग, अयोध्या नगर, भारत नगर, विष्णू नगर, प्रयाग नगर, कस्तुरबा नगर, अशोक नगर, सह्याद्री नगर, एमएमआरडीए वसाहत, कुकरेजा कंपाऊंड फेज-I & II, कामावाडी, शरदवाडी, ज्यूलियनवाडी, वाडवली गांव येथील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल. दरम्यान, नागिरकांनी अगोदरच्‍या दिवशी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा व पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
Tags