Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार - मुख्यमंत्री

नागपूर, दि. 16 : महाराष्ट्र पोलिस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलिस दलातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी पोलिस क्रीडा अकादमी सुरु करण्यात येईल. अकादमीमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नागपूर शहर पोलिस मुख्यालय, शिवाजी स्टेडियम येथे आज 31वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा 2019 चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलिस महासंचालक प्रज्ञा सरोदे, विशेष पोलिस महानिरीक्षक अनूप कुमार सिंग, विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र के. एम. एम. प्रसन्ना यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खेळ हा पोलिस दलासाठी अविभाज्य घटक आहे. यामुळे सांघिक भावना निर्माण होते. महाराष्ट्र क्रीडा स्पर्धा ही महाराष्ट्रातील पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. पोलिस दलातील खेळाडूंना त्यांच्यातील क्रीडागुण वृद्धिंगत व्हावे तसेच खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे. आजवर राज्यातील पोलिस दलाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी जीवनात खिलाडूवृत्ती आवश्यक आहे. जिंकणे तसेच हरणे या दोन्ही गोष्टींचा खिलाडू वृत्तीने स्वीकार करता यायला हवा.

पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात काम करतात. अशावेळी विविध खेळ प्रकारामुळे ताणतणावांचे व्यवस्थापन करणे सोयीचे जाते. क्रीडा स्पर्धेमुळे सांघिक भावना निर्माण होते. तसेच संघात खेळत असताना आपण उत्कृष्टपणे खेळावे ही भावना वैयक्तिक जीवनातदेखील मदतनीस ठरते. गेल्या चार वर्षांमध्ये शासनाच्या वतीने पोलिस दलासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलिस दलाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिस दलातील खेळाडू तयार होण्यासाठी लवकरच क्रीडा अकादमी उभारण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाच्या संचलनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी स्पर्धकांचा शपथविधी पार पडला. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणाऱ्या श्रीमती सोनिया मोकल,मुंबई तसेच राहुल काळे, कोकण परिक्षेत्र यांनी क्रीडा ज्योत पेटविण्यासाठी मशाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली. मुख्यमंत्र्यांनी मशालच्या सहाय्याने क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धेचे रितसर उद्घाटन केले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom