लिफ्टमध्ये चिरडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू


वसई – वसई येथील एका रहिवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये एक पाच वर्षांचा चिमुरडा चिरडून ठार झाल्याची घटना घडली आहे. तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाताना लिफ्टमध्ये चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही लिफ्ट नादुरुस्त असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. सातीवली येथील डासर रेसिडेंसी पार्कमधील इमारतीत हा अपघात घडला.

अंश गोंड असे या केजीतील मुलाचे नाव असून तो वसईतील सातीवली येथील इश्तियाक कॉम्प्लेक्स या इमारतीत आपल्या आई-वडिलांसोबत राहात होता. शनिवारी सकाळी तो भावंडासोबत इमारतीच्या आवारात खेळायला गेला. सुमारे 10.30 वाजता घरी जाण्यासाठी ते लिफ्टमध्ये शिरले. त्यांच्यापैकी एकाने पहिल्या मजल्याचे बटण दाबले, पण लिफ्टचे दार बंद झाले नव्हते. लिफ्ट तशीच वर जाऊ लागली. अंशने दार बंद करण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नात तो लिफ्टचे दार आणि बाहेरचे दार यात अडकला. जखमी अंशला रुग्णालयात नेण्यात आले, पण नंतर त्याचा मृत्यू झाला.