आशा वर्कर्सच्या मानधनवाढीसाठी शासन सकारात्मक - आरोग्यमंत्री

मुंबई, दि.6 - राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असून यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मंत्रालयात आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. यावेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, ज्ञानराज चौगुले, प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सह आयुक्त डॉ. सतीश पवार, आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील आदींसह आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात सध्या 61 हजार आशा वर्कर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी मदत होत आहे. आशा वर्कर्सचे काम चांगले असून त्यांच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य विभागाच्या योजना आणि सेवा पोहोचविण्यासाठी सहकार्य लाभत आहे. आशांच्या कामाला न्याय देण्यासाठी त्यांना मानधन वाढविण्यासाठी सकारात्मक असून त्याबाबत मार्ग काढला जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आशा ग्रामीण भागात सर्व्हे करण्याचे काम करतात, रुग्णाच्या तपासणीसाठी आशा मदत करतात अशावेळेस त्यांना मास्क सारखे साहित्य देण्यात यावे, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

आशा वर्कर्सना 10 हजार मानधन द्यावे, मोबाईल भत्ता द्यावा, दिवाळी भेट द्यावी, प्रसुतीसाठी सहाय्य केल्यास देण्यात येणाऱ्या मानधनात समानता असावी आदी मागण्या आशा वर्कर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आरोग्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले.