फडणवीस, गांधी, ठाकरे हे नवे पेशवा, त्यांना पराभूत करा - असदुद्दीन ओवेसी


मुंबई - देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी, उद्धव ठाकरे हे नवे पेशवा आहेत. ते संविधानाची मूल्ये राबवणार नाहीत. त्यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करा. तुम्हाला हक्क आणि अधिकार मिळवून देण्याची ताकद फक्त प्रकाश आंबेडकर यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी लोकसभेत पाठवा, असे आवाहन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांचे वय आता ६० पेक्षा जास्त झालेले आहे. त्यांना मृत्यूनंतर तुम्ही सत्ता देणार का ? असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थितांना विचारला.

वंचित बहुजन आघाडीतर्फे ओबीसी परिषदेचे आयोजन शनिवारी शिवाजी पार्क येथे करण्यात आले होते. यावेळी एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी बोलत होते. यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तोफ डागली. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले की, पाकिस्तानकडे पैसे नाही. सौदी अरेबियाकडून यांना भिक मिळाली, म्हणून आठ दिवस जेवणाचा प्रश्न सुटला आणि तुम्ही आमच्यावर टीका करता. इम्रान खानला आम्ही सांगू इच्छितो इथेच मुंबईचे मोहम्मद अली जिना होते. त्यांच्यासोबत आम्ही पाकिस्तानात गेलो नाही. जिना मुंबई सोडून गेले आम्ही मात्र इथेच आहोत असे ओवेसी म्हणाले.

मी मोदींना सांगू इच्छितो, तुम्ही विचार करा ३०० किलो आरडीएक्स कसे आले याचा विचार करा? पाकिस्तानच्या धमक्यांना आम्ही ठोकर मारतो पण तुम्हीदेखील जरा तपास सुरू करा. फोटोग्राफीतून बाहेर येऊन इतके प्रचंड आरडीएक्स कसे आले? हे आपले राजनितीक आणि गुप्तचर यंत्रेणेचे अपयश नाही का? गुप्तचर विभागातील लोक बिर्याणी खाऊन झोपले होते का? आपले ४० जवान मारले गेले त्याची जबाबदारी कोण घेणार? याचे उत्तर मोदींनी द्यावे अशी मागणी ओवेसी यांनी केली. मंदिराचा घंटानाद रोखण्याची भाषा करणार्‍या पाकिस्तानच्या अधिकार्‍याला सांगू इच्छितो की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत मस्जिद, मंदिर, गुरुद्वारा, बौद्ध विहारातून आवाज येतच राहणार. पाकिस्तान संपेल मात्र भारतातील हा आवाज बंद होणार नाही, असे ओवेसी यांनी पाकिस्तानला ठणकावले. पुलवामा येथे हल्ला करणारे दहशतवादी संघटन जैश-ए-मोहम्मद नसून जैश-ए-शैतान आहे, जे लोक अशा प्रकारचे भ्याड हल्ले करतात, ते अल्लाहचे बंदे नसून शैतान आहेत, असे परखड मत ओवैसी यांनी व्यक्त केले. पाकिस्तानने दहशतवाद्यांना खतपाणी देणे थांबवावे असे आवाहन ओवेसी यांनी केले. 
Tags