परळ रेल्वे टर्मिनसचे उद्घाटन, धारावी प्रकल्प सात वर्षात पूर्ण करू

मुंबई, दि.३: रेल्वे मंत्रालयाने देशातील विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी उत्तम सुविधा निर्माण केल्या आहेत. महाराष्ट्राने रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या सर्व मागण्या मंजूर केल्या असून, रेल्वेने धारावी प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आगामी सात वर्षात पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

परळ उपनगरीय रेल्वे टर्मिनसच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रेल्वे व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्यासह मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार किरीट सोमय्या,कपिल पाटील ,अरविंद सावंत, राहुल शेवाळे, रवींद्र गायकवाड, आमदार राज पुरोहित आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी धारावी पुनर्विकासाबाबत रेल्वेसोबत सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, रेल्वे विभागाने देशात व राज्यात नवीन रेल्वे स्थानक, रेल्वे मार्ग, रेल्वे गाड्यांची निर्मिती आणि अन्य सोई-सुविधा उपलब्ध करून आमूलाग्र बदल केल्याचे पहावयास मिळत आहे. अतिशय उत्तम आणि गतिमानपणे रेल्वे काम करत आहे. याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सिंगल तिकीट देण्यात येईल. महाराष्ट्र व मुंबई शहरासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली आहे. धारावी पुनर्विकासासाठीही रेल्वेने मोठे सहकार्य देऊ केले आहे. त्यामुळे हा पुनर्विकास प्रकल्पही वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

गोयल म्हणाले, केंद्र व राज्य सरकार विविध रेल्वे मार्गाच्या व अन्य सुविधासाठी काम करत आहे. रेल्वेने मुंबई शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. रेल्वे मंत्रालयाने धारावी प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी जमीन उपलब्ध करून विकास आराखडा तयार केला आहे. या निर्णयामुळे या परिसराचा विकास होणार आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत चार हजार किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले आहे तर आणखी सहा हजार किलोमीटर चे विद्युतीकरण करण्यात येत आहे.

कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते परळ उपनगरीय टर्मिनस येथून उपनगरीय सेवा, पुणे-नागपूर साप्ताहिक हमसफर एक्सप्रेस, मध्ये रेल्वे उपनगरीय नेटवर्कवर १५ डब्यांच्या अतिरिक्त ईएमयू सेवेच्या गाडीला व्हीडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. तसेच पेण-थळ व जसई-उरण विदुतीकृती लाईन, कुर्ला, शीव, दिवा, गुरू तेज बहादूर नगर,महालक्ष्मी आणि पालघर पादचारी पूल यांचे लोकार्पण करण्यात आले.मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, सुरत मुजफ्फपूर एक्सप्रेस, वलसाड पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-सुरत फ्लाईंग राणी एक्सप्रेस यांनाही व्हीडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सोलापूर- तुळजापूर-उस्मानाबाद नवीन लाईन, कल्याण-मुरबाड नवीन रेल्वे मार्ग, अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानच्या चिखलोल येथील नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक, मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी १८० अतिरिक्त एक्सलेटरची स्वीकृती यांचेही व्हीडिओ लिंकद्वारे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.