'म्हाडा'च्या कुलाबा संक्रमण शिबिरातील इमारतीचे भूमिपूजन


मुंबई - मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे कुलाबा येथील संक्रमण शिबिरात दुसऱ्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या ९१ संक्रमण गाळ्यांचा समावेश असलेल्या इमारतीचे भूमिपूजन शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कुलाबा संक्रमण शिबिरात आयोजित या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण, मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, जनसामान्यांची स्वप्नपूर्ती करण्याबरोबरच सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम म्हाडामार्फत होत आहे. देसाई म्हणाले की, अत्यंत जीर्ण झालेल्या या चाळींचा पुनर्विकास होऊन भाडेकरू / रहिवाशी यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. सामंत म्हणाले की, म्हाडाच्या मुंबईतील ५६ जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चव्हाण यांनी आज दुसऱ्या टप्प्यांतर्गत भूमिपूजन करण्यात आलेली इमारत तळ अधिक तीन मजल्यांची असून या इमारतीत ९१ संक्रमण गाळे बांधले जाणार असल्याचे सांगितले. घोसाळकर यांनी येथील भाडेकरू / रहिवाशी यांच्या विविध प्रश्नाबाबत सुमारे ६ ते ७ वेळा प्रत्यक्ष भेट देऊन संक्रमण शिबिरात भाडेकरू / रहिवाशी यांच्या स्वतः २१ सुनावण्या घेतल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात येथील भाडेकरू/ रहिवाशी अशोक केळकर व रामचंद्र खुडे यांना मालकी हक्काने वितरित करण्यात आलेल्या सदनिकेच्या चाव्या ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.

कुलाबा येथील संक्रमण शिबिरातील इमारती अत्यंत जीर्ण झाल्यामुळे शिबिरात राहणाऱ्या भाडेकरू / रहिवाशी यांना कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या हेतूने म्हाडातर्फे तीन टप्प्यामध्ये पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रथम टप्प्यामध्ये जीर्ण झालेल्या चाळी पाडून तेथे २ नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत.कार्यक्रमाला मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी दिनकर जगदाळे आदी उपस्थित होते.
Tags