स्वच्छता सर्वेक्षणात मुंबई महापालिकेची घसरण

मुंबई - केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरातील शहरे व महानगरे यांचे स्वच्छता अभियानांतर्गत नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात 'सर्वेात्कृष्ट व नाविण्यपूर्ण उपक्रम' (बेस्ट कॅपिटल सिटी इन इनोव्हेशन ऍण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस) राबविणा-या राजधान्यांच्या श्रेणीत मुंबई अव्वल ठरली आहे. मात्र केंद्रीय स्वच्छता सर्वेक्षणात महापालिकेची घसरण झाली आहे. सन २०१८ मध्ये १८ व्या क्रमांकावर असलेल्या मुंबईची स्वछतेच्या परीक्षेत यंदा पिछेहाट झाली आहे. थ्री स्टार रेटिंगची स्वप्न पाहणारे मुंबई चक्क ४९ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. 

या स्पर्धेत मुंबईचा क्रमांक सुधारण्यासाठी महापालिकेने २०१७ मध्ये अनेक प्रयोग केले. मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा निर्धारही करण्यात आला. या प्रयत्नांना यश येऊन २०१८ मध्ये स्वच्छता मोहिमेत महापालिका १८ व्या क्रमांकावर आली. जागतिक दर्जाच्या मुंबई शहराला थ्री स्टार रेटिंग मिळावे यासाठी महापालिकेने केंद्राकडे अर्ज केला होता. मात्र मुंबईकरांकडून कचरा उचलण्याचा शुल्क वसूल करण्यात येत नसल्याने महापालिकेला थ्री स्टार रेटिंग नाकारण्यात आले होते. यामुळे या स्पर्धेतूनच बाहेर पडण्याचा महापालिकेचा विचार सुरु होता. यावर्षी केंद्राचे स्वच्छता निरीक्षक पूर्व कल्पना न देताच हजर झाल्यामुळेही पालिका अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. केंद्र सरकारने बुधवारी नवी दिल्लीत जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षण २०१९ च्या निकालात महापालिकेची घसरण झाल्याचे उघड झाले आहे. मात्र महापालिकेच्या 'एच पश्चिम' विभागात स्थानिक नागरिकांच्या मदतीने एक मेट्रीक टन कच-यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प, मरीन ड्राईव्ह येथील अद्ययावत शौचालय व इतर नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी हा सन्मान देण्यात आलेला आहे. याबाबत बुधवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे संपन्न झालेल्या एका विशेष समारंभात केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल व उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महापालिकेच्या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण, कच-यापासून खतनिर्मिती, जनजागृती, प्रदर्शने यासारख्या बाबींचा समावेश होता. महापालिका क्षेत्रातील कचरा संकलनाबाबत घरोघरी (हाऊस टू हाऊस कलेक्शन) जाऊन कचरा संकलन करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर महापालिकेच्या वेगवेगळ्या उद्याने, इमारती, रुग्णालये, कार्यालये इत्यादी ठिकाणी ओल्या कच-यापासून (व्हर्मी कंम्पोस्ट) खतनिर्मिती करणारे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराचा भूखंड असणा-या सोसायट्या, इमारती किंवा दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा तयार होतो; अशा सोसायट्या वा रेस्टॉरंट अथवा मॉल इत्यादींना त्यांच्या स्तरावर कच-यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले. याचाही सकारात्मक परिणाम कचरा कमी होण्यावर झाल्याने हा गौरव करण्यात आला असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
Tags