घराजवळ पालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यात रक्त चाचण्या

मुंबई -आजारांचे निदान करण्यासाठी करण्यात येणा-या विविध चाचण्यांसाठी दीड ते दोन महिन्यांची करावी लागणारी प्रतीक्षा आता दूर होणार आहे. रुग्णांना पालिकेच्या त्यांच्या घराजवळच्या रुग्णालय, दवाखान्यात विविध रक्त चाचण्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही सेवा सुरु केली जाणार असल्याने हजारो सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर या मोठ्या रुग्णालयांत रोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने विविध रक्त चाचण्यांसाठी रुग्णांना प्रतिक्षा करावी लागते. या चाचण्या मोठ्या रुग्णालयातच उपलब्ध असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होते. मोठ्या रुग्णालयांवरचा भार कमी करण्यासाठी आपली चिकित्सा योजनेंतर्गत पालिकेने मुंबईतील पालिकेच्या घरा जवळच्या दवाखान्यांत सर्वप्रकारच्या रक्त चाचण्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा लागू करण्यासाठी पालिकेने गेल्या आठवड्यात प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना आदेश दिले असून आदेश मिळाल्यापासून ४५ दिवसांत ही सुविधेची अंमलबजावणी केली नाही तर संबंधित कंत्राटदाराला दंड भरावा लागणार आहे. खासगी कंत्राटदारांमार्फत ही सेवा मार्च महिन्यांत सुरु केली जाणार होती. मात्र खासगी लॅब असल्याने त्याची नियमावली काय आहे, कशाप्रकारे अंमलबजावणी करावी लागणार याबाबतचा निर्णय घेण्यास प्रशासनाला उशीर झाला. प्रायोगिक तत्वावर काही दवाखान्यात ही सेवा सुरु करण्याचे ठरले होते, मात्र ठेकेदार तयार नसल्याने तसे न करता सर्वच दवाखान्यात, रुग्णालयात सुरु करण्याचा निर्णय घेऊन मागील आठवठ्यात ठेकेदारांना कार्यादेशही जारी करण्यात आल्याची माहिती एका अधिका-याने दिली.

कशी मिळणार सुविधा --पालिका दवाखाने, रुग्णालयांत खासगी लॅबचा कर्मचारी रुग्णाचे रक्त घेऊन ठरलेल्या वेळेत रिपोर्ट पालिका रुग्णालयाच्या संबंधित विभागाला देईल. विविध चाचण्यांनुसार रिपोर्टला वेळ लागतो. त्यानुसार सहा तास ते पाच आठवड्यांपर्यंत रिपोर्ट मिळणार आहे. खासगी लॅबमध्ये एक हजार किंवा त्याहून अधिक शुल्क रक्त चाचण्यांना द्यावे लागत होते. आता याच चाचण्या पालिकेच्या रुग्णालयांच ५० ते १०० रुपयांत होणार आहेत.

येथे होणार रक्त चाचण्या -- भाभा (कुर्ला), शताब्दी (गोवंडी), एम.टी. अग्रवाल (मुलुंड), वीर सावरकर (मुलुंड), मुक्ताबाई (घाटकोपर), राजावाडी (घाटकोपर), मॉ (चेंबूर), भाभा (बांद्रा), वि. एन. देसाई (सांताक्रुज), सिद्धार्थ रुग्णालय (गोरेगांव), एसके पाटील (मालाड), एम.डब्ल्यू. देसाई (मालाड), कस्तूरबा (बोरीवली), भगवती (बोरीवली), बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (कांदिवली), ईएनटी (फोर्ट), कस्तूरबा (चिंचपोकली), टीबी रुग्णालय (शिवडी), लॅप्रोसी रुग्णालय (वडाला), आदी रुग्णालय, दवाखाना तसेच मॅटर्निटी रुग्णालयांमध्ये या चाचण्या उपलब्ध होणार आहेत.
Tags