करदात्या मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये जाणार गाळात

JPN NEWS
मुंबई - पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील माल्यांची सफाई केली जाते. काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेत नालेसफाई घोटाळा उघडकीस आला होता. मात्र त्यानंतरही पालिका प्रशासनाने आपली जबाबदारी झटकत कंत्राटदाराला हातसफाई करण्याची सूट दिल्याने करदात्या मुंबईकरांचे ३८ कोटी रुपये गाळात जाणार आहेत.

नेमेचि येतो मग पावसाळा... या म्हणीनुसार पावसाळ्यापूर्वी पालिकेला नद्या-नाले, पर्जन्यजलवाहिन्या, छोटे नाले यांच्या सफाईची तयारी करावी लागते. यंदा पश्चिम उपनगरातील मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्याच्या दोन कामांकरिता ३,२३,८३,७७८ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर मिठी नदीसह पश्चिम उपनगरातील नद्या, मोठे नाले आणि पातमुखे यांच्यातील गाळ काढण्याच्या सोळा कामांसाठी २८,०८,५१,५२१ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्व उपनगरातील एम/प विभागातील छोट्या नाल्यातील, पेटिका नाल्यातील तसेच रस्त्यालगतच्या पर्जन्यजलवाहिन्यांमधील गाळ काढण्यासाठी ६,७४,१४,३८१ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरातील गाळ काढून तो वाहून नेण्यासाठी मेट्रिक टनासाठी २२७३ रु. दर आकारण्यात येणार आहे, तर पश्चिम उपनगरातील नद्या-नाल्यांतील गाळ कोढून तो वाहून नेण्यासाठी मेट्रिक टनाकरिता १६०९ रु. दर आकारण्यात येणार आहे. पावसाळापूर्व ७० टक्के, पावसाळ्यात १५ टक्के, तर पावसाळ्यानंतर १५ टक्के असे गाळ काढण्याचे परिमाण ठरविण्यात आले आहे. मात्र यात कंत्राटदाराचे उखळ पांढरे होण्याची शक्यता अधिक आहे. गाळ काढण्याचे परिमाण टक्केवारीट ठरविण्यापेक्षा संपूर्ण गाळ काढण्यातून देण्यात येणारी सूट संशयाच्या भोवऱ्यात फिरणारी आहे. 

गाळ टाकण्यासाठी महापालिकेकडे मोकळ्या जागा नाहीत. त्यामुळे गाळ काढणे, जमा करणे, डंपरव्दारे वाहून नेणे आणि त्याने निश्चित केलेल्या मुंबई बाहेरील जागेत नेऊन टाकणे असा मिळून हा दर आकारण्यात आला आहे. गाळ वाहून नेणाऱ्या डंपरचा मागोवा घेण्याकरिता व्हीटीएस प्रणाली उपयोगात आणली जाणार आहे आणि गाळाचे वजन पूर्वीच्या जकात नाक्यांवरील वजन काट्यांवर करण्यात येणार आहे. मात्र हे वजनकाटे आता सुस्थितीत असतील का हा खरा प्रश्न आहे. येथे कंत्राटदाराकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करदात्या मुंबईकरांचा पैसा गाळात जाण्याची शक्यता अधिक आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !