रोगराई टाळण्यासाठी मुंबईतील नाले होणार बंदिस्त


मुंबई - मोकळ्या नाल्यांमुळे निर्माण होणारी दुर्गंधी तसेच रोगराई टाळण्यासाठी मुंबईतील झोपडपट्ट्या, शाळा-कॉलेजजवळील नाले बंदिस्त केले जाणार आहेत. यामध्ये सिमेंट काँक्रिटचे बांधकाम असलेल्या नाल्यांवर कमानीच्या आकाराची आच्छादने टाकली जाणार आहे. लवकरच याबाबत विशेष धोरण आखले जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

मुंबईत झोपडपट्टीच्या बाजूला असणाऱ्या शेकडो नाल्यांमुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय उघड्या नाल्यांमध्ये रहिवाशांकडून थेट कचरा टाकण्याचे प्रकारही सर्रास घडतात. तर काही वेळा शाळा-कॉलेज, झोपडपट्ट्यांजवळील नाल्यांमध्ये मुले, रहिवासी पडल्याने जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर नाले आच्छादनांनी बंदिस्त करण्याचे धोरण प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्यान, दहिसर पूर्व येथील वसंत हिला सोसायटी जवळील व्ही. एच. देसाई नाला, शिव टेकडी जवळील संभाजी नगर नाला, बोरिवली पूर्व येथील काजूपाडा कॉसमॉस नाला आणि बोरडे रोड जवळील पालिका उद्यानातून जाणाऱ्या नाल्यांवर आच्छादने टाकण्याचा प्रस्ताव प्रशासनाचा होता मात्र पालिकेच्या या प्रस्तावावर अनेक नगरसेवकांनी आक्षेप घेत केवळ एकाच विभागात हे काम न करता सर्व विभागांमध्ये नाले आच्छादित करण्यासाठी खास धोरण आणावे अशी मागणी लावून धरली होती.

संपूर्ण मुंबईत धोरण राबवून नाल्यांवर आच्छादने टाकल्यामुळे रोगराई, दुर्गंधीला आळा बसेल. शिवाय शाळा-कॉलेज नव्हे तर मुंबईतील सर्व नाले आच्छादित करण्याची सूचनाही नगरसेवकांची आहे. त्यानुसार मुंबईतील नाल्यांवर आच्छादने टाकण्याबाबत खास धोरण तयार केले जाणार असून त्यानंतरच या संबंधीतला प्रस्ताव आणला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Tags