Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राजकीय पक्ष व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे - जिल्हाधिकारी

मुंबई, दि. 25 : लोकसभा निवडणूक 2019 करिता विविध राजकीय पक्ष व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमांचे व सूचनांचे पालन करुन आपला निवडणूक अर्ज दाखल करावा, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी, शिवाजी जोंधळे यांनी स्पष्ट केले. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित प्रतिनिधींशी चर्चा करताना ते बोलत होते. 

जोंधळे पुढे म्हणाले, विविध राजकीय पक्षांनी उपहारगृह, फर्निचर, वापरण्यात येणारी वाहने याचे दरपत्रक संदर्भातील सूचना तातडीने सादर कराव्यात. ज्या उमेदवारावर गुन्हा दाखल असेल, त्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर स्वत:हून वृत्तपत्रामध्ये कमीत कमी 3 वेळा तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमात जाहिरात प्रसिध्द करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपला निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चासाठी स्वत: बँक खाते उघडणे आवश्यक असल्याचे सांगितले.

निवडणूक अधिकारी पवार व गवळी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या अर्जातील सर्व रकान्यांमध्ये माहिती भरणे आवश्यक आहे. अर्जातील कुठलीही माहिती मुद्रणातून गाळू नये. तसेच अर्जातील उल्लेखित रकान्यातील माहितीमध्ये उमेदवारांनी विचारलेल्या बाबींचा स्पष्ट उल्लेख न केल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. याची सर्व राजकीय पक्षाने नोंद घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी निवडणूक अधिकारी व्दय शहाजी पवार, बन्सी गवळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, फरोग मुकादम उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom