राज्यातल्या सर्व जागा बहुजन वंचित आघाडी लढवेल - प्रकाश आंबेडकर


अकोला - भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अखेर ‘काँग्रेससोबतच्या आघाडीच्या सर्व आशा संपल्या आहेत’ असं जाहीर करत प्रकाश आंबेडकरांनी ‘राज्यातल्या सर्व जागा बहुजन वंचित आघाडी लढवेल’, असं स्पष्ट केलं आहे. अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या १५ मार्चला राज्यातील ४८ जागांवरील भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार असल्याचे यावेळी आंबेडकर यांनी सांगितले. मुंबईतील बैठकीनंतरच वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा मंगळवारी रंगल्या होत्या. भारिपचे स्थानिक नेते लक्ष्मण माने यांनी त्यासंदर्भात घोषणा देखील केली होती. मात्र, ‘सोलापुरातून निवडणूक लढवणार म्हणून अकोला सोडणार असं नाही. दोन ठिकाणांहून निवडणूक लढवता येऊ शकते’, असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या मतदारसंघाबाबतचा संभ्रम कायम ठेवला होता. त्याशिवाय काँग्रेससोबतच्या आघाडीचं काय झालं? याचा सस्पेन्स देखील कायम होता. मात्र, मंगळवारी अकोल्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.