ह्रदयविकाराच्या झटक्याने निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू


उल्हासनगर - भगवान मगरे यांचे निवडणुकीचे काम करताना दुपारी मृत्यू झाला. सी ब्लॉक येथील मतदार केंद्रात काम करीत असतांना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर, त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

उल्हासनगर महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेले भगवान मगरे यांना लोकसभा निवडणुकीचे काम देण्यात आले होते. सकाळी निवडणूक साहित्य घेतल्यानंतर कॅम्प नं- ३ सी ब्लॉक येथील मीनल अर्जुन चव्हाण विद्यालयात निवडणूक मतदार केंद्र ८७ मध्ये भगवान मगरे सहकाऱ्यांसोबत गेले होते. दुपारी मतदारसंघात निवडणुकांसाठीचे काम करीत असतांना, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बेशुद्ध पडलेल्या मगरे यांना सहकाऱ्यांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले.