गैरसमजाला बळी न पडता युती मजबूत राहील यासाठी काम करा - सुनिल राऊत


मुंबई - कुठल्याही गैरसमजाला बळी न पडता ईशान्य मुंबईत शिवसेना-भाजप युती मजबूत राहील यासाठी काम करा, अशा सुचना शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातील शिवसैनिकांना दिल्या आहेत. तसेच शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार मनोज कोटक हे लाखोंच्या मतांनी जिंकून येतील, असा दावा करतमी आपल्या सोबतच आहे, असा विश्वासही सुनिल राऊत यांनी मनोज कोटक यांना दिला आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओच शिवसेनेच्या वतीने जारी करण्यात आल्याने शिवसेनेच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या छुत्या समझोत्याच्या तर्कवितर्कांना पुर्णविराम मिळाला आहे.

चार दिवसांपुर्वी भांडुप, सुभाष नगर येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित केलेल्या एका इमारत बांधकाम प्रकल्पाच्या भुमीपुजन समारंभासाठी शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत उपस्थित होते. या कार्यक्रमाला कोटक यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारही उपस्थित होते. यावेळी महायुतीच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला निवडणुकीसाठी शुभेच्छा देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. त्यावर खुलासा करण्यासाठी राऊत यांनी आणखी एक व्हिडीओ प्रसारीत करत, शिवसेना संपुर्ण ताकदीने मनोज कोटक यांचाच प्रचार करणार असल्याची प्रांजळ कबुली दिली. तसेच शिवसैनिकांनीही मनात कोणताही गैरसमज न बाळगता कोटक यांच्या विजयासाठी जोरदारपणे कामाला लागावे, अशा सुचनाही त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिल्या आहेत.

याशिवाय एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सुनिल राऊत यांनी या प्रकरणावर अधिक भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘आपली मराठी संस्कृती अशी आहे की आपणआपल्या विरोधकांनाही शुभेच्छा देतो. तो एक खासगी कार्यक्रम होता. व्यासपीठावर प्रतिस्पर्धी उमेदवार अचानक समोर आले आणि मी त्यांना बोलण्याच्या ओघात शुभेच्छा दिल्या. याचा अर्थ आम्ही त्यांना पाठिंबा दिला असे होत नसल्याचेही राऊत म्हणाले. शिवसेना मनापासून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांचे काम करीत असून त्यापलीकडे यात काहीही नाही, असेही ते म्हणाले.