ईशान्य मुंबईत संजय पाटील यांच्या प्रचारात सर्वपक्षीय कार्यकर्ते उतरले


मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय काँग्रेस पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी गट (कवाडे गट), आरपीआय (गवई गट) आणि मित्र पक्षाचे ईशान्य मुंबईतील उमेदवार संजय दिना पाटील यांनी निवडणूक प्रचारात प्रचंड मुसंडी मारलेली आहे. आवेदनपत्र भरण्याच्या अगोदर व नंतर मुलुंड, भांडूप, कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, गोवंडी-मानखुर्द या परिसरात सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गट करून विभागातील पदयात्रेच्या नियोजनाची जबाबदारी घेतली आहे. स्वतः संजय दिना पाटील सकाळी व संध्याकाळी निघणाऱ्या पदयात्रेत सहभागी होऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत.

विशेष म्हणजे त्यांच्या पदयात्रेला कार्यकर्त्यांसोबत स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. आज भांडुप (पूर्व) येथून दादू कोपरकर मार्ग, कमल सागर, टाटा नगर, उदयश्री रोड, अशोक नगर, वीर सावरकर मार्ग, कांजूर व्हिलेज या भागातील पदयात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कोपरकर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे, उपविभाग अध्यक्ष अजय मिटेकर, मधुकर केनी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धनंजयदादा पिसाळ, कुंदन मोहन पाटील, संदेश म्हात्रे, प्रशांत दास, मनीषा तुपे व विभागातील सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पदयात्रेत सहभागी होऊन मतदारांशी संपर्क साधून संजय दिना पाटील यांच्यासाठी मताच्या रूपाने आशीर्वाद मतदारांकडे मागत होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी सांगितले कि,  संजय दिना पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी ईशान्य मुंबई आहे हे विसरू नका. आपण आपल्या डोक्यावर परप्रांतीयांना घेऊन नाचणार कि, स्थानिक घरच्या माणसाला मोठा करून ह्या विभागाचा ‘खासदार’ करायचा. याचा विचार करण्याची ही सुवर्णसंधी आलेली आहे. त्यामुळे ‘संजय दिना पाटील’ ही व्यक्ती स्थानिक या भागातील निवासी व ‘मराठी’ आहे व मला खात्री आहे ईशान्य मुंबईतील जनता सुज्ञ आहे की थापाडे! कोण काम करणारे? संजय पाटील हेच लाखाच्या मताने निवडून येतील.

विक्रोळी विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे म्हणाले की, ही निवडणूक अस्तित्वाची असून ‘मराठीबाणा’ दाखविण्याची वेळ आलेली आहे. आमच्यासाठी उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचे नसून तो ‘मराठी उमेदवार’ आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात ‘मराठीबाणा’ चालणार व दिल्लीत ‘मराठीबाणाचे’ महत्त्व व ताकद समजून देण्यासाठी तेथे संजय दिना पाटील या ढाण्या वाघाची गरज आहे.

फेरीवाले, गोरगरीब, सामान्य नागरिक, युवक नाक्या-नाक्यावर उत्स्फूर्तपणे पदयात्रेत सहभागी होऊन या वर्षात परिवर्तन घडविणारच अशी घोषणा देत आहेत. आज गुरुवार असल्याकारणाने व्यापारी देखील मोठ्या संख्येने पदयात्रेत सामील झाले होते.