Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

ईशान्य मुंबईत भाजपतर्फे मनोज कोटक यांना उमेदवारी


मुंबई - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना व थेट मातोश्रीवर केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप किरीट सोमय्यांना चांगलेच भोवले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपची युती झाल्याने सोमय्यांचा पत्ता कापून त्यांच्या ऐवजी पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेच्या विरोधाला झुकून भाजपने सपशेल लोटांगण घातल्याचे बोलले जाते आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. येथून किरीट सोमय्या यांनी दोनवेळा निवडणूक लढवून ते जिंकून आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. मागील लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेमधील युती तुटली. त्यानंतर सोमय्या यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले होते. यामुळे शिवसेना विरुद्ध सोमय्या असा वाद शिगेला पोहचला होता. त्यांच्या विरोधात शिवसेनेची उघडपणे नाराजी व्यक्त केली जात होती. आता लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपाची युती झाली असून निवडणूक एकत्र लढवत आहे. निवडणुका एकत्र लढवल्या जात असल्या तरी ईशान्य मुंबईमध्ये मात्र सोमय्या यांना शिवसेनेकडून जाहिर विरोध केला जात होता. त्यामुळे भाजपपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. नवा उमेदवार कोण असेल याची चाचपणी केली जात होती. अखेरपर्यंत सोमय्यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. सोमय्यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे नेते प्रसाद लाड, प्रकाश मेहता, प्रवीण छेडा यांनी थेट मातोश्रीवर जाऊन मनधरणीही केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेनेचे मन वळवण्याचे प्रयत्नही झाले. मात्र शिवसेनेने सोमय्यांच्या विरोधातला सूर कायम ठेवल्याने तिढा वाढत राहिला. अखेर हा तिढा सुटून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोटक यांनी २०१४ साली भांडुप विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेनेच्या अशोक पाटील यांनी त्यांचा पराभव केला. कोटक महापालिकेत नगरसेवक म्हणून सलग तीनवेळा निवडून आले. सद्या ते भाजपचे पालिकेतील गटनेते आहेत. त्यापूर्वी त्यांनी शिक्षण समिती अध्यक्षपदही भूषवले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom