हिमालय पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष

मुंबई -
हिमालय पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याची धक्कादायक कबुली गुरुवारी खुद्द पालिका प्रशासनाने स्थायी समितीत दिली. त्यामुळे ऑडिटरवर दुर्घटनेचे खापर फोडणा-या प्रशासनाचा हलगर्जीपणाही या घटनेला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्ला देणा-या डी. डी. देसाईचे नाव हटवून १६ पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे मुंबईतील या पुलांचे दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. 

या पुलाच्या दुरुस्तीचा डी. डी. देसाई कंपनीचा अहवाल सप्टेंबर २०१६ मध्ये आला होता. या पुलाची स्थिती चांगली असल्याचे अहवालात म्हटले असले तरी काही किरकोळ दुरुस्तीचा आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तत्पूर्वी पूल विभागाला न कळवताच २०१६- १७ मध्ये वॉर्ड स्तरावर या पुलाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य अभियंत्यांचा सल्लाही घेण्यात आला नव्हता. नियमबाह्य सुशोभीकरणामुळे अतिभाराने पूल कोसळल्याचे यावेळी स्थायी समितीत अनुमान काढण्यात आले. त्यामुळे तत्कालीन सहायक आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही लावून धरण्यात आली. मुंबईतील ए, बी, सी, डी आणि ई विभागातील १६ पुलांच्या दुरुस्तीच्या मंजुरीचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यावेळी देसाईच्या अहवालाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे समोर आले. डी. डी. देसाई याच्या सल्ल्यानुसार आणि त्याने नेमलेल्या ठेकेदाराकडून पुलांच्या दुरुस्तीला मंजुरी द्यावी असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवल्याने सभागृहाने आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. सीएसटीएम येथील हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईज् असोसिएटेड कंपनीच्या सल्ल्याने पुलांच्या दुरुस्ती करण्याच्या प्रशासनाच्या आश्चर्यकारक निर्णयामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडली. कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा या वर्दळीच्या भागातील १६ पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी १३ कोटी ८६ लाख, ४० हजार ८९ रुपये खर्च केला जाणार आहे. हिमालय पूल दुर्घटनाप्रकरणी दोषी ठरलेल्या देसाईज असोसिएटेड कंपनीला काळ्या यादीत व पॅनलवरून हकालपट्टी करण्यात आली असताना डी. डी. देसाईचा सल्ला कसा काय घेतला जात आहे? हिमालय पुल दुर्घटनेनंतर देसाईने केलेल्या इतर पुलांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना मुंबईतील पुलांच्या व भुयारी मार्गाची दुरुस्ती पुन्हा डी.डी. देसाईच्या सल्ल्याने होणार असेल तर याला जबाबजार कोण असा प्रश्न विचारण्यात आला. स्थायी समितीत पुलांच्या दुरुस्तीचा विषय चर्चेला आला असताना समागृहात सुमारे तासभर या विषयावर गंभीर चर्चा करण्यात आली. त्यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी डी. डी. देसाईचे नाव प्रस्तावातून काढून टाकण्याची उपसूचना मांडली. सभागृहाने ती एकमताने मान्य केली आणि या १६ पुलांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला. 

आयआयटीकडून मूल्यमापन---
प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी सांगितले की, डी. डी देसाई कंपनीच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या सल्ल्याने नियुक्त करण्यात आलेल्या जैन इन्फ्रास्ट्रक्चरला बांधकामाचा ठेका देण्यात येणार असला तरी या कामाचे मूल्यमापन आयआयटी आणि व्हीजेटीआय करणार आहे. लोकहितासाठी या सर्व बांधकामांची जबाबदारी महापालिका प्रशासन घेणार आहे. त्यामुळे डी. डी. देसाईचे नाव काढून टाकण्यात येणार आहे आणि लोकहितासाठी या सर्व बांधकामांची जबाबदारी महापालिका प्रशासन घेणार असल्याच्या मुद्द्यावर ए, बी, सी डी आणि ई विभागातील अतिधोकादायक पुलांच्या दुरुस्तीला गुरुवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.

या पुलांची होणार दुरुस्ती-
- ग्रॅन्टरोड रेल्वेवरील पूल
-- ऑपेरा हाऊस पूल
-- फ्रेंच पूल
-- हाजीअली भुयारी मार्ग
-- फॅाकलॅन्ड रोड (डायनाब्रिज)
-- प्रिसेंस स्ट्रीट पादचारी पूल
--- चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग
-- सीएसटी भुयारी मार्ग
--- ग्लोरिया चर्च उड्डाणपूल
-- सीताराम सेलम वाय ब्रीज उड्डाणपूल
--- ईस्टर्न फ्रीवे
-- एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल
--- वाय. एम. उड्डाणपूल
-- सर पी डिमेलो पादचारी पूल
-- डॅाकयार्ड रोड पादचारी पूल
--- चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग
Tags