Type Here to Get Search Results !

आरोग्यास घातक ठरणारे सरबत, थंडपेये आढळल्यास परवाना जप्त

मुंबई - रस्त्यावरील ८७ टक्के सरबत, बर्फाचे गोळे, थंडपेये पिण्यास योग्य नसल्याचे समोर आल्यानंतरही मुंबईत असे स्टॅाल्स सर्रास दिसत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोहिम तीव्र केली जाणार असून असे स्टॅाल्स आढळल्यास परवाना जप्त केला जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या एका अधिका-याने दिली.

कुर्ला रेल्वे स्थानकातील सरबत प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने मुंबईभरातील रस्त्यावरील सरबत, बर्फाचे गोळे, उसाचा रस अशा थंडपेयांची तपासणी केली. या तपासणी मोहिमेत घेतलेल्या नमुन्यात ८७ टक्के नमुने पिण्यास योग्य नसून आरोग्यास घातक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पालिकेने अशा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र तरीही असे स्टॅाल्स पुन्हा सर्रास आढळून येत आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पालिकेतील कर्मचारी, अधिकारी मोठ्या प्रमाणात गुंतले असल्याने या कारवाईसाठी मनुष्यबळही कमी पडतो आहे. मात्र तरीही उपलब्ध स्टाफकडून अशा प्रकारची तपासणी मोहिम सुरु असून ही मोहिम अधिक तीव्र केली जाणार आहे. कारवाई केल्यानंतर एकदोन दिवस असे विक्रेते दिसत नाहीत. मात्र त्यानंतर पुन्हा आपला व्यवसाय ठरलेल्या जागी सुरु केला जात असल्याचे स्थिती आहे. त्यामुळे पालिकेकडून कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. असे विक्रेते पुन्हा आढळल्यास इतर कारवाईसह दुकानाचा परवानाही जप्त केला जाणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले. नागरिकांनीही आरोग्यास घातक असणारे असे थंडपेये पिणे टाळावे असे आवाहनही पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
Tags

Top Post Ad

Below Post Ad