भेदरलेल्या किशोरींचे उद्याच्या लोकप्रतिनिधींकडे मागणीपत्र


मुंबई - कोणत्याही निवडणुकीत राजकीय पक्ष त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध करतात, पण 17 व्या लोकसभा निवडणुकीनिमित्त लर्निंग कम्युनिटीच्या मुलींनी किशोरवयीन मुलींना असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी उद्याच्या लोकप्रतिनिधींसमोर त्यांचे मागणीपत्रच ठेवले आहे. भयग्रस्त वातावरणात वावरणाऱ्या मुलींना सुरक्षितता मिळावी हाच त्यामागचा उद्देश आहे.

मुंबई व उपनगरातील विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या मूलभूत अधिकारांसाठी काम करणाऱ्या लर्निंग कम्युनिटीला यंदा पाच वर्षे पूर्ण होत आहेत. मंबईतील 100 किशोरी लीडर्सनी शहरातील सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षित वातारणासाठी आणि बदलासाठी एक क्रांतीचा सुरुवात केली आहे. सलग पाच वर्षे या मुलींनी मुंबई्च्या 10 प्रभागांध्ये फिरून मुलींना निर्भय वातावरणात वावरता यावे यासाठी जनजागरण केले. मागील वर्षी 35 वस्त्यांमध्ये फिरून 1150 मुलींचे सर्व्हेक्षण केले. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुलींवर येणारी बंधने आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचाव्या म्हणून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतांचा जोगवा मागायला येणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे त्यांनी `गर्ल्स चार्टर्ड ऑफ डिमांड` ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी सर्वांचे सहकार्य अपेक्षित ठेवले आहे.

किशोरींच्या समस्या --
1) सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी अपुरा उजेड, कमी पाणीपुरवठा आणि दरवाजा-खिडक्यांच्या दुर्दशेमुळे शौचास जाताना 85 टक्के मुलींना असुरक्षित वाटते.
2) सार्वजनिक ठिकाणी लैंगिक अत्याचाराचा वाईट अनुभव येत असल्यामुळे वस्तीतील सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचा वापर करणे अशक्य वाटते.
3) खेळाच्या मैदानांचा उपयोग वाहनतळ म्हणून केला जातो. तेथे मुलांचीच मक्तेदारी असते. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या दिवसात मुलींना मैदानाचा वापर करता येत नाही.
आजच्या आणि उद्याच्या लोकप्रतिनिधींनी या प्राथमिक आणि मूलभूत मागणींकडे लक्ष द्यावे यासाठी या मुलींचे प्रयत्न आहेत. ही सुरुवात आहे. उद्या या प्रयत्नांचे चळवळीत रूपांतर होईल, असा विश्वास लर्निंग कम्युनिटीच्या स्नेहल पवार आणि यग्मा परमार यांनी व्यक्त केला.

धडपडणाऱ्या मुलींची टॅगलाईन
1) अब नही तो कब - द टाइम इज नाऊ
2) जे हार्ड वर्कने साधत नाही ते स्मार्ट वर्कने साधू या

मुलींच्या सुविधांसाठी झालेले प्रयत्न -
1) स्थानिक नगरसेवक आणि नेत्यांबरोबर बैठका
2) नेते आणि लोकप्रतिनिधींबरोबर गटचर्चा
3) वस्त्यांमध्ये दबावगट निर्माण करणे
4) लैंगिक संवेदनशील संदेशासह वॉल पेंटिंग
5) वस्ती बैठका
6) स्वाक्षरी मोहिमा
7) फ्लॅश मॉब
8) मुलींसाठी क्रीडादिन.
Tags