मनोज कोटक यांनी मुख्यमंत्री, ठाकरे आणि आठवले यांची घेतली भेट


मुंबई: ४ एप्रिल - उत्तर -पुर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या महायुतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सर्वच नेत्यांनी कोटक यांना लोकसभा निवडणुकीतील पहिल्यावहिल्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोटक यांनी गुरूवारी सकाळी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उत्तर पुर्व मुंबई मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनीही कोटक यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर थेट मातोश्री हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान गाठत कोटक यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मा.कोटक यांच्या महापालिकेतील कार्याची प्रशंसा केली. महापालिकेतील कामाच्या बळावर तुम्ही जरूर यशस्वी व्हाल, अशा शुभेच्छाही मा. उद्धवजींनीदिल्या. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री व रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले यांचीही मा. कोटक यांनी त्यांच्या वांद्रे पुर्व येथील संविधान यानिवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी आपले कार्यकर्ते तुमच्या प्रचारात पुर्ण ताकदीने सामिल होतील, असे आश्वासन आठवले यांनी दिले.