मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीच्या मालकाला मोदींनी का पकडले नाही - प्रकाश आंबेडकर


कोल्हापूर - मुंबईवर २६ / ११ ला दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी करकरेंना मारणारे दहशतवादी बोट घेऊन चार दिवस गुजरातच्या पोरबंदरमध्ये होते. त्या बोटीच्या मालकाला तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी का पकडले नाही, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते कोल्हापुरात उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. अरुणा माळी यांच्या प्रचारार्थ गांधी मैदान येथे शनिवारी जाहीर सभा झाली. यावेळी आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, शहीद हेमंत करकरे यांना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने शाप दिला असल्याचे म्हटले आहे. मग त्या शापाची गोळी कुठली व कोणाची होती, हे मला सांगावे. भाषणात रोज बलिदान दिलेल्यांचे पंतप्रधान मोदी उल्लेख करतात. मग जर प्रज्ञा सिंहला उमेदवारी दिली असेल, तर पंतप्रधानांची भूमिका नेमकी कोणती, हे स्पष्ट होते.

भोपाळमधील प्रज्ञा सिंह या भाजप उमेदवाराच्या विधानाचे मोदी यांनी कुठेही खंडन केलेले दिसत नाही. आरएसएसकडे बंदुका आहेत. त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत. जे काही त्यांनी पेरले, ते भोपाळच्या रूपाने उगवत असल्याचे दिसू लागले आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा येथील मोठ्या संख्येने तरुण लष्करात आहेत. ही मंडळी भाजपला मतदान करणार नाहीत. त्यामुळे मतदारांनी शांतता हवी, की अशांतता, हे ठरवावे असेही ते म्हणाले.

मोदी दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. ज्या अर्थी मोदी साध्वीच्या वक्तव्याचे खंडन करत नाहीत, त्या अर्थी हे स्पष्ट होत आहे. जे पेरले ते भोपाळमध्ये उगवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. साध्वी प्रज्ञासिंह प्रकरणावरून त्यांनी मोदींवर चांगलीच तोफ डागली.