महापालिकेचे जास्तीत जास्त भूखंड ताब्यात घेणार

मुंबई - महापालिकेच्या कित्येक भूखंडांवर अतिक्रमण झाले असून ते ताब्यातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे भूखंड ताब्यात घेण्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, असा निर्धार मुंबई महापालिकेच्या सुधार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सदानंद परब यांनी व्यक्त केला.

परब म्हणाले की, सुधार समितीचे पद हे माझ्यासाठी नवीन आहे, पण मी पालिकेचा जुना (1997 पासून) सभासद आहे. त्यामुळे अनेक प्रश्न माझ्या माहितीचे आहेत. भूखंड ही पालिकेची मालमत्ता असते. पण प्रशासनाने लक्ष न पुरवल्यामुळे त्या मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे. पालिकाच त्या मालमत्तांना पारखी झाली आहे. अशा मालमत्तांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्या पालिकेच्या ताब्यात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे परब यांनी सांगितले. 

पालिका अधिकारी आणि अतिक्रमण करणारे यांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे काही भूखंड पालिकेच्या ताब्यातून जातात, किंवा लीजवर असलेले भूखंड मुदत पूर्ण झाली तरी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे पालिकेचे मोठे नुकसान होते. याप्रकरणी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणार असल्याचे परब यांनी सांगितले.

मालमत्तांची सध्याची स्थिती -
एकूण मालमत्ता - 4733
पालिकेच्या नावावर - 708
नावावर होणे बाकी -614
मालमत्ता विभागाच्या ताब्यात - 1713
विकास योजनांमध्ये असलेले - 621
Tags