Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी स्वीकारला पदभार

मुंबई, दि. 13 : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव यू.पी.एस. मदान यांच्याकडून आज सकाळी अकराच्या सुमारास पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य सचिव मेहता लगेचच दुष्काळ आढाव्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रवाना झाले.

भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1984 च्या तुकडीचे असलेले मेहता यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या आय.आय.टी. मधून बी. टेक. (स्थापत्य अभियांत्रिकी) ही पदवी संपादित केली. युनायटेड किंगडम (ग्रेट ब्रिटन) मधून एम.बी.ए. (वित्त) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एल.एल.बी.) प्राप्त केली.

धुळ्याचे परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरूवात झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी अहमदनगर,नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक महापालिकेचे आयुक्त, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (सुधार); केंद्र सरकारचे फलोत्पादन विभागाचे संचालक; महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) चे व्यवस्थापकीय संचालक; महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक; पुनर्रचित रत्नागिरी वायू व वीज मंडळावर नियुक्ती, महाराष्ट्र राज्य शासनाच्या ऊर्जा खात्याचे प्रधान सचिव;महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष; फेब्रुवारी 2009 ते जानेवारी 2015 या कालावधीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) चे व्यवस्थापकीय संचालक, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आणि त्यानंतर एप्रिल 2015 पासून ते मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते.

अत्यंत महत्त्वाच्या विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या कुशलतेने सांभाळणाऱ्या मेहता यांनी नाशिकमध्ये महापालिका आयुक्त असताना तेथे 1992-93 मध्ये कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन केले. मेहता यांची केंद्र सरकारने व्ही. के. शुंगलू यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या 'वितरण सेवांची सुधारणा व आर्थिक स्थिती' या विषयावरील उच्चस्तरीय समितीमध्येही नियुक्ती केली होती.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom