शिवसेनेची बुरखाबंदीची मागणी चुकीची - रामदास आठवले


मुंबई दि.1 - इस्लामी दहशतवादाचे कारण सांगत श्रीलंका; फ्रांस, ब्रिटन आदी देशात मुस्लिम महिलांना नकाब आणि बुरखा बंदी करण्यात आल्याचे उदाहरण देऊन भारतातही नकाब आणि बुरख्याला बंदी करण्याची शिवसेनेने सामना या मुखपत्रातून केली आहे. शिवसेनेने केलेली ही मागणी चुकीची असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

भारत हा सर्वधर्मसमभाव जोपासणारा देश आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे सर्व धर्मियांना त्यांची संस्कृती परंपरा जोपासण्याचा समान अधिकार स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येक मुस्लिम महिला आतंकवादी नसते.बुरखा घालण्याचा मुस्लिम महिलांचा परंपरागत हक्क आहे. त्यामुळे सरसकट सर्व मुस्लिम महिलांना बुरखा आणि नकाब घालण्यास बंदी घालण्याची मागणी करणे चुकीचे आहे. याबाबत शिवसेनेने प्रधानमंत्र्यांकडे मागणी केली असली तरी अशी मागणी घटनाबाह्य असून ती मंजूर होऊ शकत नाही असे आठवले यांनी स्पष्ट केले. बुरखाबंदीच्या शिवसेनेच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा विरोध राहील असे आठवले यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी आतंकवाद्यांचा बुरखा फाडला पाहिजे. मात्र सरसकट सर्वच मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यास बंदी करणे अन्यायकारक ठरेल असे आठवले म्हणाले. उत्तर भारतात अनेक ठिकाणी हिंदू महिला ही आदराने चेहऱ्यावर पदर घेत असतात.उन्हात चेहरा झाकण्यासाठी रुमाल पदर वापरला जातो. त्यामुळे सरसकट सर्वांना बुरखाबंदीची मागणी करणे ही शिवसेनेची भूमिका चुकीची असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.