महिनाभराच्या कामानंतरही नाले गाळातच - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

08 May 2019

महिनाभराच्या कामानंतरही नाले गाळातच


मुंबई - नाले सफाईच्या कामांना महिना उलटून गेला तरीही शहर व उपनगरांतील बहुतांशी ठिकाणी नाले अद्याप गाळातच आहेत. याचे पडसाद बुधवारी स्थायी उमटले. पावसापूर्वी नालेसफाई झाली नाही, तर यंदा मुंबई थोड्या पावसांतही तुंबेल अशी भीती व्यक्त करीत विरोधकांसह सत्ताधा-यांनीही प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. येत्या १३ मे ला नालेसफाईच्या कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

नालेसफाईचे काम यंदा दरवर्षीपेक्षा लवकर सुरु होऊनही अनेक ठिकाणी नाले गाळातच आहेत. ३५ ते ४० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी स्थायी समितीत नालेसफाईबाबतची वस्तूस्थिती हरकतीच्या मुद्द्याव्दारे मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. बहुतांशी ठिकाणी नाल्यांतील गाळ तसाच आहे. काही नाले डेब्रिजने भरलेले आहेत. महापौरांच्या वॉर्डातच नाले गाळांनी भरलेले आहेत. महिनाभर काम सुरु होऊनही नाल्यांची सफाई झालेली नसल्याने यंदा पहिल्या पावसांतच मुंबई पाण्यात जाण्याची शक्यता असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली. आचारसंहितेच्या कारण सांगत प्रशासन कंत्राटदारांना वाचवत असल्याचा आरोपही रावी राजा यांनी केला. मुंबईभर मेट्रोची कामे सुरु आहेत. पालिका अधिका-यांनी अशा कामांच्या भेट देऊन पाहणी करणे आवश्यक होते, मात्र अजूनही पाहणी झालेली नाही. ई वॅार्डमध्ये रस्ते, नाल्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे येथे यंदाच्या पावसांत ठिकठिकाणी पाणी भरणार असून त्याला प्रशासन जबाबदार असल्याचे सपाचे रईस शेख यांनी सांगितले. तर भाजप व शिवसेनेनेही नालेसफाईच्या कामांबाबत असमाधान व्यक्त केले. एफ नॅार्थमध्ये थोड्या पावसांतही पाणी तुंबते. येथे अजूनही नालेसफाई झालेली नाही. काही ठिकाणी नाल्यातील काढलेला गाळ नाल्यांच्या बाजूला पडून असल्याने तो उचलला नाही, तर पुन्हा नाल्यात वाहून जाऊन हा परिसर जलमय होईल, अशी भीती भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी व्यक्त केली. तर नालेसफाईच्या कामांशी आचारसंहितेशी काय संबंध असा प्रश्न विचारत २३ मे पर्यंत थांबलो तर नाल्यांची सफाई पावसापूर्वी कशी होणार याकडे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी लक्ष वेधले. नालेसफाईची कामे ३५ ते ४० टक्के झाली आहे. जेथे यंत्रणा कमी पडली तेथे व्यवस्था करण्यात आली आहेत. तर नालेसफाईच्या कामांबाबत समाधानकारक उत्तर न देता प्रशासनाने सारवा सारव केली. ३ तारखेच्या आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत पावसापूर्वीची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश अधिका-यांना देण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी यावेळी सांगितले. नालेसफाईच्या कामांची गती मंदावली आहे. अधिका-यांनी नगरसेवकांनी मांडलेल्या मुद्दयाकडे लक्ष वेधून कामाला गती द्यायला हवी. अतिरिक्त आयुक्तांनीही नालेसफाईच्या कामांची पाहणी केली पाहिजे. येत्या सोमवारी नालेसफाईच्या कामांचा अहवाल सादर करा असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

नालेसफाईवरून सत्त्ताधारीही असमाधानी -
अजूनही काही ठिकाणी ३५ ते ४० टक्केच नालेसफाई झाली असून आपण काठावर पास आहोत. महिनाभर काम सुरु असतानाही नालेसफाईत प्रगती दिसत नसल्याचे सांगत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाच्या कामावर असमाधान व्यक्त केले. अनेक ठिकाणी डेब्रिज, गाळ नाल्यांच्या बाजूला पडून आहे. गझदरबंध येथे डेब्रिज तसेच आहे. तर काही ठिकाणी प्लास्टिक, कन्स्ट्रक्शनचे साहित्यही पडून आहेत. बीकेसीमध्ये मॅन्ग्रोज नाल्यांमध्ये आलेत. गाळ काढणारा रोबोही कुठे दिसत नाहीत. चमडावाला नाल्याचीही सफाई झालेली नाही. महिनाभर काम सुरु असूनही ३५ ते ४० टक्केच नालेसफाईचे काम झाले हे भूषणावह नाही, असे सांगत राऊत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

Post Top Ad

test