Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यातील सर्व खासदार कोट्याधीश, २८ खासदारांवर गुन्हे


मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यातून निवडून आलेले सर्व म्हणजेच ४८च्या ४८ खासदार कोट्यधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता २३.०४ कोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या खासदारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिल्याचा अहवाल महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)ने दिला आहे. विजयी झालेले सर्व आमदार कोट्यधीश आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या २३ उमेदवारांची सरासरी मालमत्ता २१.११ कोटी, तर शिवसेनेच्या निवडून आलेल्या १८ उमेदवारांची सरासरी मालमत्ता १२.९७ कोटींची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार खासदारांची सरासरी मालमत्ता ८९.४१ कोटी, तर काँग्रेसच्या एकमेव खासदाराची सरासरी मालमत्ता १३.७४ कोटी आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांची मालमत्ता २.९५ कोटी आहे, असे या अहवालात म्हटले आहे. विजेत्या पाच उमेदवारांची मालमत्ता ५० कोटींपेक्षा जास्त असून सर्व विजेत्या उमेदवारांची सरासरी देणी ३.३७ कोटींची आहे. भाजपाच्या खासदारांची सरासरी देणी ५.५४ कोटींची असून शिवसेनेच्या खासदारांची सरासरी देणी १.२३ कोटी आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांची सरासरी देणी ५६ लाख आहे. भाजपाचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पॅन घोषित केलेले नाही. त्यांची संपत्ती २.७८ कोटींची आहे.

२८ खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे -
निवडून गेलेल्या २८ खासदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून यातील १५ खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, धमकावणे अशा गुन्ह्यांचा समावेश असल्याचे 'एडीआर'ने आपल्या अहवालात म्हटले आहे. भाजपाच्या १३, शिवसेनेच्या ११, तर राष्ट्रवादी, काँग्रेस व एमआयएमच्या प्रत्येकी एका खासदारावर गुन्हे दाखल आहेत. एडीआरने दिलेल्या अहवालावर नजर टाकली असता साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे १७ आणि किरकोळ स्वरूपाचे ४४ गुन्हे दाखल आहेत. भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे दोन तर किरकोळ स्वरूपाचे २९ गुन्हे नोंद असून, राजन विचारे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे सात आणि किरकोळ स्वरूपाचे १६ गुन्हे दाखल आहेत. नितीन गडकरी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे पाच आणि किरकोळ स्वरूपाच्या पाच गुन्ह्यांची नोंद आहे. महिला खासदार पूनम महाजन, प्रीतम मुंडे आणि भावना गवळी यांच्यावरदेखील गुन्हे दाखल असल्याचे अहवालात म्हटले आहे.

१७ उमेदवार पाचवी ते बारावी -
विजेत्या उमेदवारांमध्ये ४० पुरुष तर आठ महिला उमेदवार आहेत. यातले १७ उमेदवार पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. २६ उमेदवार पदवीपासून डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहेत. विजेत्यांपैकी ११ उमेदवार ३१ ते ४० वर्षे, २६ उमेदवार ४१ ते ६० आणि ११ उमेदवार ६१ ते ८० वर्षे वयोगटात मोडतात.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom