Type Here to Get Search Results !

विधानसभेत काँग्रेस मनसे आघाडी नाही !


मुंबई | “यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षासोबत आम्ही आघाडी करणार नाही”, असे काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिंघवी बोलत होते. 

दरम्यान, मनसे जरी लोकसभा निवडणूक लढवत नसली तरीही मनसेकडून भाजपविरुद्ध प्रचार करण्यात आला. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला-राष्ट्रवादीला झाल्याचे समजते. तर दुसरीकडे मनसेची राष्ट्रवादीशी वाढलेली जवळीक यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असेल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र, सिंघवी यांच्या या स्पष्टीकरणानंतर याबाबतचा संभ्रम वाढला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील मनसेशी आघाडीसंदर्भात आमच्याशी बोलणे झाले आहे. परंतु आमच्या पक्षाच्या सिद्धांतांमध्ये मोठे अंतर आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पक्षासह काँग्रेस कोणताही करार करणार नाही. त्याचप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत देखील आम्ही मनसेशी कोणतीही युती करणार नाही”, असे संघवी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, याबाबत अद्याप मनसे अथवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Top Post Ad

Below Post Ad