Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

प्रवि‍ण परदेशी यांनी स्वीकारली मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे


मुंबई - महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवि‍ण परदेशी यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. महानगरपालिकेचे मावळते आयुक्त अजोय मेहता यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून शासनाने नियुक्ती केली असून त्यांच्या जागी परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेहता यांच्याकडून परदेशी यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते.

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये एम. ए. इकॉनॉमिक्स ही पदव्युत्तर पदवी संपादित केल्यानंतर परदेशी यांनी १९८५ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकाविला. १९९९ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून त्यांनी एम. एस्सी. सोशल अँड इकॉनॉमिक पॉलिसी ही पदवीदेखील मिळवली. भारतीय प्रशासकीय सेवेचा ३४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या परदेशी यांनी आजवर लातूरचे जिल्हाधिकारी, सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, अमरावती महसूल विभागीय आयुक्त, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव अशी अत्यंत महत्त्वाची पदे सांभाळली आहेत.

१९९३ मध्ये लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत असताना त्यावेळी झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या आपत्तीनंतर त्यांनी पुनर्वसनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.जागतिक बँकेच्या पुनर्वसन कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी ३० गावे आणि एक लाखाहून अधिक घरांचे सक्षम पुनर्वसन केले. त्यांची ही कामगिरी लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने २००१ मधील कच्छ (गुजरात) भूकंपावेळी पुनर्वसन कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून पुन्हा जबाबदारी दिली. परदेशी यांची सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेता २००२ ते २००७ आणि २००९ ते २०१० या ७ वर्षांच्या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांना प्रतिनियुक्तीवर निमंत्रित करून आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱया सोपवल्या. यामध्ये विविध देशातील निरनिराळ्या आपत्तींचे निवारण, त्याबाबतची धोरण आखणी यांचाही समावेश होता.

मोठय़ा प्रकल्पांची कामे वेगाने मार्गी लावणे, रेल्वे - राष्ट्रीय महामार्ग-बंदरे यांच्यासारखी पायाभूत सुविधांची कामे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. वनसंवर्धन कायदा, भूसंपादन कायदा यांच्या माध्यमातून कामे करताना संबंधित पात्रताधारकांना योग्य व न्याय मोबदला मिळावा, त्यासोबतच किचकट प्रक्रिया सोपी सुटसुटीत होऊन प्रकल्प वेगाने मार्गी लागावे यासाठी परदेशी यांनी केलेली कामगिरी ही महत्त्वाची मानली जाते. वने आणि वन्यजीव संवर्धन, जैवविविधता, पर्यावरण रक्षण व शाश्वत विकास, तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराने प्रशासनात सुलभता आणि पारदर्शकता हे प्रविण परदेशी यांच्या आवडीचे विषय आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom