पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवर पालिकेचे विशेष लक्ष

मुंबई - नाले सफाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाही पावसात पाणी तुबण्याचे प्रकार घडतात. मुंबईत पाणी तुंबण्याची 225 ठिकाणे असून येथे पाणी तुंबून राहू नये यासाठी पालिकेचे विशेष लक्ष राहणार आहे. पावसापूर्वी नाले सफाईची कामे पूर्ण केली जातील असा दावाही प्रशासनाने केला आहे.

मुंबई महापालिका पावसापूर्वी नाले सफाईची कामे पूर्ण करण्यासाठी कामाला लागली आहे. ३१ मे पर्यंत ७० टक्के नाले सफाईचे काम पूर्ण करावे लागणार आहे. मात्र १० दिवस बाकी राहिले असतानाही अजूनही बहुतांशी नाले गाळानी भरलेले आहेत. वांद्रे आणि काही भागातील नाल्यांची स्थिती पाहता अजूनही काही ठिकाणी समाधानकारक नाले सफाई झाली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. मात्र पावसापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण केली जातील असा दावा प्रशासनाने केला आहे. नाले सफाई वेळेत पूर्ण झाली नाही तर अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने पाणी तुंबणाऱ्या ठिकाणावर विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे.

सखल भागातील पाणी उपसून काढण्यासाठी ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पाअंतर्गत गेल्या नऊ वर्षांत सहा जल उदंचन केंद्रे बांधण्यात आली असून त्यासाठी महानगरपालिकेने प्रत्येकी दीडशे ते दोनशे कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र तरीही शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची भीती कायम आहे. गेल्यावर्षी शहरातील 225 ठिकाणी पाणी तुंबणार असल्याचे पालिकेच्या पाहणीत दिसून आले होते. त्यातील 60 ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या अधिक असणार होती. यात दरवर्षीप्रमाणे हिंदमाता, भायखळा, दादर, माहीम, माटुंगा, शीव, कुर्ला, अंधेरी, मालाड, घाटकोपर या भागांचा समावेश होता. या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्याने विशेष लक्ष दिले होते. पंपाच्या सहायाने पाणी खेचल्याने १२० ठिकाणी पाण्याचा निचरा करता आला. गेल्यावर्षी येथे पाणी तुंबण्याची मोठी स्थिती उदभवली नसल्याचे प्रशासनाचे म्हटले आहे. मात्र यंदा पाणी तुंबण्याची आणखी 45 ठिकाणे आढळल्याने पालिकेपुढे आव्हान असणार आहे.

पावसात पाणी तुंबणार नाही यासाठी पावसापूर्वीची सर्व कामे वेगाने करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सर्व अधिकाऱयांना दिले आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत.
शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांच्या राडारोडय़ामुळेही गेल्या वर्षी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. हा अनुभव लक्षात घेता महानगरपालिकेने या वर्षी शहरातील काही ठिकाणांची जबाबदारी मेट्रोवर सोपवली आहे. यात मुख्यत्वे पश्चिम उपनगरात काम सुरू असलेल्या भूमिगत मेट्रोच्या स्थानकांचा समावेश आहे. त्या ठिकाणी असलेल्या पर्जन्य जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या अन्यत्र हलवताना पाण्याचा प्रवाह अडला जाणार नाही, याची काळजी संबंधित संस्था घेणार असल्याचे सांगण्यात आले.
Tags