आदित्य पांचोलीने केले कंगनाचे लैंगिक शोषण, तक्रार दाखल


मुंबई - दहावर्षांपूर्वी आदित्य पांचोलीने लैंगिक शोषण करीत मारहाण केल्याची तक्रार कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेलने अंधेरी येथील वर्सोवा पोलीस ठाण्यात केली आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आदित्य पांचोलीनेही कंगना राणावतच्या वकिलाने आपल्याला बलात्कारच्या खटल्यात गोवण्याची धमकी दिल्याची प्रतितक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. 

रंगोली चंडेल आणि आदित्य पांचोली यांना त्यांच्या तक्रारी नोंदविण्यास सांगण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यापूर्वी या तक्रारींबद्दल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. २०१७ मध्ये कंगनाने आदित्यवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. चित्रपटसृष्टीत आपण नव्याने दाखल झालो असताना हे अत्याचार झाल्याचे कंगनाने म्हटले होते. आदित्यने आपल्याला एका घरात कोंडून ठेवले होते. तेव्हा पहिल्या मजल्यावरील खिडकीमधून उडी मारत आपण पळ काढला होता, असेही कंगनाने आपल्या तक्रारीत म्हटले होते. या आरोपानंतर आदित्यने कंगनाविरूद्ध आपल्या बदनामीचा खटला दाखल केला होता. गेल्या मंगळवारी आदित्यने आपल्याला कंगनाच्या वकिलाकडून ६ जानेवारी रोजी धमकावले गेल्याची माहिती पोलिसांना दिली.