महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणार


मुंबई - यंदा मान्सूनचे आगमन लांबणार असून मान्सून केरळात ६ जून रोजी दाखल होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. केरळात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सून सहा ते सात दिवसांनी दाखल होतो.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्कायमेटनेही मान्सून ४ जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. गेल्या वर्षी २९ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाचा पाऊस हा सर्वसाधारण असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर पाऊस सुरू होताच अल निनोचा प्रभाव कमी होईल आणि यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
Tags