मध्य रेल्वेवरील ७८ कल्व्हर्टची सफाई पूर्ण


मुंबई - येत्या पावसाळ्यात रेल्वे आणि लोकलसेवा खंडित होऊ नये, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपापल्या हद्दीतील नाल्यांची आणि कल्व्हर्टची सफाई मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यासंबंधी बैठक घेऊन पावसाळापूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यंदाच्या पावसाळयात रेल्वे सेवेचा खेळखंडोबा होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासन सज्ज झाले असून नाले व कल्व्हर्टची सफाई केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मध्य रेल्वेवरील ७८ कल्व्हर्टची आणि तब्बल ११३ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई झाली आहे आणि पावसाळ्यात पाणी तुंबून रेल्वेसेवा ठप्प होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी महापालिका उच्च क्षमतेची २७ पम्पिंग यंत्रणा बसवणार असून गेल्या वर्षी संवेदनशील ठिकाणी १९ पंप बसवण्यात आले होते. शिवाय रेल्वेच्या विभागाकडूनही ७९ पम्पिंग यंत्रणा बसवण्यात येणार आहे आणि गतवर्षी रेल्वेच्या विभागांत (डिव्हिजन्स) ४२ पंप बसवण्यात आले होते. त्यांची संख्या यंदा वाढवण्यात आली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) २५८ जवान सध्या तैनात करण्यात आले असून अतिरिक्त २५२ जवान पावसाळ्यापूर्वी तैनात करण्यात येतील, सर्व स्थानकांमधील सीओपीमध्ये असलेल्या भेगा भरून त्या बुजवण्यात येतील, खाजगी हद्दीतील झाडे वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्यास त्यांची छाटणी मुंबई पालिकेच्या सहकार्याने करण्यात येईल. कल्व्हर्ट आणि नालेसफाई करताना त्यातील चिखल काढून ते स्वच्छ करण्यात येणार, रेल्वे मार्गालगतचे नाले, स्लीपर्स आणि फाऊंडेशनभोवती कचऱ्याचा व अन्य अडथळा असल्यास तो दूर करण्यात येईल, रेल्वे सिग्नल्सचे, लोकलच्या मोटर्सचे आणि केबिन्सचे वॉटर प्रूफिंग करणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाला मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Tags