भाजप प्रवेशासंदर्भात बातम्या निराधार - विश्वजित कदम


मुंबई - गेल्या २ दिवसांपासून माध्यमांमधून माझ्या भाजप प्रवेशासंदर्भात प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा दिवंगत कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांचे पुत्र आणि महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वजित पतंगराव कदम यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्वजित पतंगराव कदम भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र, विश्वजित कदम यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षित पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. याचपार्श्वभूमीवर विश्वजित कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, विश्वजित कदम यांनी हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे. “मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे हे सांगणे हाच वेडेपणा आहे. मी काँग्रेस विचारांचा एकनिष्ठ आहे. मी काँग्रेसमध्येच राहणार”, असे विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले आहे. एका जाहीर पत्राद्वारे विश्वजित कदम यांनी हा खुलासा केला आहे.