मुंबईत मतमोजणीच्या १८ ते २५ फेऱ्या


मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे ला होत आहे. मतमोजणीदरम्यान किमान १८ फेऱ्या होणार असून, मुंबई उत्तर-मध्य व मुंबई उत्तर-पश्चिम या दोन मतदारसंघात सर्वाधिक २५ फेऱ्या होतील. मुंबईतील सहा मतदारसंघांसाठी तीन ठिकाणी मतमोजणी होत असून, त्यासाठी प्रत्येक केंद्रात प्रत्येक लोकसभा मतदारसंघानिहाय १४ टेबल असतील.

मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत असलेल्या मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या २१ व मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात २२ फेऱ्या होतील. उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात किमान १८ ते कमाल २३, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात किमान १८ ते कमाल २५, मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात किमान २० ते कमाल २५ व मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात किमान १८ ते कमाल २४ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी दोन विधानसभा मतदारसंघासाठी मिळून एक याप्रमाणे मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रांसाठी एकूण १८ निरीक्षक मुंबईत आले आहेत. जवळपास २०० सूक्ष्म निरीक्षकही आयोगाने तैनात केले आहेत.