३०० मिमी पाऊस झाल्यास मुंबई जलमय

Anonymous
मुंबई - दिवसभरात सलग ३०० मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता व्यक्त करतानाच पाण्याचा तातडीने निचरा करण्याच्या उपाययोजनाही मुंबई महापालिकेनेही तत्पर ठेवल्या आहेत, अशी कबुली महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. मुंबईत २६८ पाणी भरण्याची ठिकाणे असून त्यापैकी १८० ठिकाणे हमखास पाणी भरण्याची (फ्लडिंग पॉइंट) ठिकाणे वर्तविण्यात आली आहेत.

अपूर्ण नालेसफाई, ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची आणि मेट्रोची कामे यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबई पाण्यात जाण्याची भीती विरोधकांकडून व्यक्त होत आहे. त्यातच शहर व उपनगरात पाणी भरण्याची सुमारे २२५ ठिकाणे असून त्यात ४३ नवीन ठिकाणांची भर पडली आहे. १८० ठिकाणे फ्लडिंग पॉइंट म्हणून वर्तविण्यात आली आहेत. थोड्या पावसातच हे भाग जलमय होणार आहेत. यामध्ये माटुंगा, मालाड, भांडुपमधील सर्वाधिक ठिकाणे आहेत. पाणी तुंबू नये यासाठी नालेसफाई, मॅनहोल सफाई आणि दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई, पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणची अतिक्रमणे हटविणे, तसेच पम्पिंग स्टेशन सज्ज ठेवणे अशी कामे पालिका दरवर्षी ठेवते. त्यानंतरही शहर आणि उपनगरातील विविध भागांत पाणी तुंबते आणि महापालिका प्रशासन टीकेचे धनी होते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागते. यंदाही मागील दोन महिन्यांपासून पर्जन्य जलवाहिन्या विभाग, विद्युत आणि देखभाल विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा रस्त्यावर उतरून काम करीत आहे.

मागील वर्षी पाणी तुंबलेल्या ठिकाणी यंदा पाणी तुंबू नये, यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करण्यात करण्यात येत आहे. ३१ मेची मुदत टळली तरीही बंदिस्त नाल्यांची सफाई अद्यापही चालू आहे. सात ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. तसेच सुमारे २५० ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत. मात्र ही कामे होत असली तरी पाणी साचणार नाही याबाबत महापौर खात्रीशीर सांगू शकत नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नालेसफाईबाबत समाधान व्यक्त केले होते. त्यामुळेच आताही त्यांनी सलग ३०० मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस झाल्यास पाणी तुंबेल अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Tags