Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पहिल्या पावसाचा तडाखा - बेस्ट, रेल्वे वाहतुकीवर परिणाम


मुंबई - गेले चार महिने उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना काल रात्री पासून पडत असलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. मुंबईत पावसाने आज सकाळ पासून जोरदार बॅटिंग सुरु केल्याने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ठाण्याच्या मखमली तलाव, मुंबईत सायन, हिंदमाता, अंधेरी, कुर्ला आदी सखल विभागात पाणी साचल्याने बेस्टचे बस मार्ग वळवण्यात आले आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेनही उशिराने धावत असल्याने मुंबईकरांना आपल्या नियोजित ठिकाणी जाण्यास उशीर लागत आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची प्रतीक्षा असते. मात्र जून संपता संपता पावसाने दमदार हजेरी लावून सुखद धक्का दिला. सकाळपासूनच पावसाने संततधार सुरु ठेवल्याने पाऊस आला रे आला असे म्हणत छत्र्या घेऊनच चाकरमानी घराबाहेर पडले. मात्र सकाळी साडेदहा- अकरा वाजताच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत गेला. घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, चेंबूर, वांद्रे, सायन, वडाळा, अंधेरी, बोरिवली, मानखुर्द, परळ, दादर आदी सखल भागात पाणी साचले होते. पहिल्याच पावसात हिंदमाता येथेही पाणी साचले होते. मिलन सबवेमध्येही पाणी तुंबल्याने येथील वाहतूक वळवण्यात आली. अंधेरी सबवेत कंबरेपर्यंत पाणी साचल्याने येथील वाहतुकीचा खोळंबा झाला. येथील मोगरा नाला तुंबल्याने परिसरात पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आणि परिसरात पाणीच पाणी साचले होते. चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग, शेल कॉलनी येथे रस्त्यावर पाणी तुंबले होते. पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती. मुलुंड, कांजूरमार्ग, घाटकोपर येथील रेल्वे ट्रकमध्ये पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक कोंडीमुळे कार्यालयात नियोजित वेळेत पोहचण्यास उशिर झाला. सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ६१ पंपाचा वापर करण्यात आला. शहरात १०, पूर्व उपनगरात ३० तर पश्चिम उपनगरात २१ पंप सुरू करून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा लागला.

शहर विभागापेक्षा पूर्व आणि पश्चिम उपनगरात जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात शहरात ३.५० मिलिमीटर पूर्व उपनगरात १८.२३ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात १०.६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ वाजल्यापासून ११ पर्यंत शहरात ३४.२३ मिमी, पूर्व उपनगरात ६४.१४ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ७८.२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासून वरळी अग्निशमन केंद्र येथे २७, पूर्व उपनगरात चेंबूर अग्निशमन केंद्र येथे २५ तर पश्चिम उपनगरात गोरेगांव येथे ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बस मार्ग वळवले-
ठाण्याच्या मखमली तलाव येथे पाणी साचल्याने ४९४ व ४९९ हे दोन मार्ग वंदना टॉकीज येथून फिरवण्यात आले. मुंबईत सायन रोड क्रमांक २४ येथे पाणी साचल्याने २५,२२,३०२, ३०५ आणि २१३ हे मार्ग मुख्य रस्त्याने वळवण्यात आले. हिंदमाता येथे पाणी साचल्याने बस क्रमांक १,४ ,५ ,६ ,७,८ ,११, २१ हे मार्ग हिंदमाता पुलावरून तसेच शिवडीला जाणाऱ्या बस मार्ग २१२, २१३, ४० हे शारदा टॉकीज व दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथून वळवण्यात आल्या.

विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू --
दिवसभरात विजेच्या धक्क्याने पाच पैकी तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पश्चिम उपनगरांत अंधेरी पश्चिम येथे सकाळी पावणे आठच्या सुमारास आण्णा नगर, आरटीओ कार्यालय समोर विजेच्या धक्क्याने काशिमा युडीयार (६०) या महिलेचा मृत्यू झाला. तर गोरेगाव पूर्व येथील दुर्गामाता मंदिराच्या मागे चार जणांना विजेचा धक्का लागला. यातील राजेंद्र यादव (६०), संजय यादव (२४) या दोघांचा मृत्यू झाला तर आशादेवी यादव (५) व दिपू यादव (२४) हे दोघे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

भिंत कोसळून तीन जण जखमी
दादर येथील सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदान येथे संरक्षक भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. चंद्रकांत तोडवले (३५), विजय नागर (३५) व चेतन ताठे (२८) अशी जखमींची नावे आहेत. 

पालिकेच्या पर्जन्य मापकावरील पावसाची नोंद -
शहरात -- ६४.५२ मिमी
पूर्व उपनगर -- ११६.२७ मिमी
पश्चिम उपनगरांत -- ८९.१० मिमी

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom