तिस-या दिवशीही दिव्यांशचा शोध सुरुच

Anonymous
मुंबई - गोरेगाव येथील आंबेडकर चौकाजवळच्या उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या दिव्यांश सिंह याचा शुक्रवारी तिस-या दिवशीही शोध लागलेला नाही. अग्निशमन दलाचे जवान, पोलिस, महापालिका कर्मचा-यांकडून बुधवारी रात्री पासून दिव्यांशचा शोध सुरु आहे. शुक्रवारीही शोधकार्य युद्ध पातळीवर सुरु राहिले आहे. या शोध मोहिमेदरम्यान बचाव पथकाने तब्बल दहा किमी लांबीची ड्रेनेज लाईन तपासली मात्र, त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. गटारापासून जवळच असलेल्या नाल्यांमध्ये तो वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान अजूनही शोध लागला नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. 

दिव्यांश हा आई-वडील आणि दोन भावंडांसह गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकरात राहत होता. बुधवारी रात्री त्याचे वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता त्यांच्या मागे दिव्यांशही गेला. वडील रस्त्यावर कुठे दिसले नाहीत म्हणून तो मागे फिरत असतानाच उघड्या गटारात पडला. काही वेळातच दिव्यांशची आई त्याला शोधण्यासाठी घराबाहेर आली. मात्र,दिव्यांश दिसत नसल्यामुळे तिने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून येथील लोक जमा झाले. त्यानंही दिव्यांश कुठे न दिसल्याने जवळच असलेल्या मशिदीबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्हीमध्ये दिव्यांश गटारात पडल्याचे समजताच पोलिस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरु केले आहे. घटना घडली त्या दिवसापासून अग्निशामक दल या चिमुकल्याचा शोध घेत आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी रात्री साडे दहाच्या सुमारास दिव्यांश हा खेळताना घराबाहेर आला त्यानंतर परत घराकडे जाताना अंधार असल्याने तो चुकून जवळच्या उघड्या गटारात पडला. दिवसभर या भागात जोरदार पाऊस झाल्याने गटारातून पावसाचे पाणी वेगाने वाहत होते, या पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला असावा, असे उपलब्ध सीसीटीव्हीमधील चित्रीकरणावरुन दिसते आहे. अग्निशमन दल, पोलिस, एनडीआरएफ व पालिका कर्मचा-यांकडून रात्रंदिवस शोध सुरु आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ड्रेनेज लाइनची १० किलोमीटरपर्यंत पाहणी केली. जेसीबीच्या सहाय्याने ड्रेनेज लाइन फोडून मुलाचा शोध घेतला. मात्र, तरीही गटारात पडलेल्या दिव्यांशचा पत्ता लागलेला नाही. ड्रेनेज लाइनमध्ये कॅमेरे सोडून मुलाचा शोध घ्यावा, अशी मागणी रहिवाशांनी अग्निशमन दलाकडे केली आहे, विविध पर्याय शोधून शोध लावला जातो आहे. शुक्रवारीही दिवसरात्र तपास सुरु ठेवण्याचा निर्णय तपास पथकांनी घेतला आहे.
Tags