मुंबईत दहीहंड्या फोडताना १९९ गोविंदा जखमी

JPN NEWS

मुंबई - मुंबईत दहीहंड्या फोडताना १९९ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या आणि राज्य सरकारच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी १९९ गोविंदांपैकी १६२ गोविंदांवर उपाचार करून घरी सोडण्यात आले आहे, तर ३७ गोविंदांवर अद्याप विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.

महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मोठ्या आयोजकांच्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, छोट्या दहीहंड्या मुंबईत अनेक ठिकाणी लावण्यात आल्या. मोठ्या दहीहंड्या नसल्याने यावेळी जखमी गोविंदाची संख्या कमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला आहे. मुंबईत दहीहंड्या फोडताना मिळालेल्या आकडेवारीनुसार १९९ गोविंदा जखमी झाले आहेत.

नायर रुग्णालयात १७ जखमी गोविंदा दाखल झाले. त्या सर्वांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. केईएम रुग्णालयात ४२ गोविंदा दाखल झाले. त्यापैकी ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ५ जण उपचार घेत आहेत, तर २ जण स्वत: डिस्चार्ज घेऊन गेले आहेत. सायन रुग्णालयात २० गोविंदा दाखल झाले त्यापैकी १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७ जणांवर उपचार सुरू आहेत. जेजे रुग्णालयात ४ गोविंदा दाखल झाले त्यापैकी ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर अद्याप उपचार सुरू आहेत.

जसलोक रुग्णालयामध्ये एक गोविंदा दाखल झाला. त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हिंदुजा रुग्णालयात २ गोविंदा दाखल झाले. त्यापैकी एका गोविंदावर उपचार सुरू आहेत तर एक जण डिस्चार्ज घेऊन केईएम रुग्णालयात उपचारासाठी भरती झाला आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातून ६ गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जीटी रुग्णालयात एक गोविंदा उपचार घेत आहे. बॉम्बे हॉस्पिटलमधून एका गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गोवंडी शताब्दी रुग्णालयात ४ गोविंदा दाखल झाले, त्यापैकी एकाला सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे, एक गोविंदा स्वतःहून डिस्चार्ज घेऊन गेला आहे. तर एक गोविंदा रुग्णालयातून न सांगताच घरी गेला आहे. एम टी अग्रवाल रुग्णालयात ६ गोविंदा दाखल झाले. त्यांच्यावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राजावाडी रुग्णालयात २० गोविंदा दाखल झाले. त्यापैकी १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ४ जण उपचार घेत आहेत. तर एकाला सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
बांद्रा भाभा रुग्णालयात २१ गोविंदा दाखल झाले, त्यांच्यावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. कूपर रुग्णालयात २५ गोविंदा दाखल झाले. त्यापैकी २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर उपचार सुरू आहेत. ट्रॉमा केअर रुग्णालयात ८ गोविंदा दाखल झाले त्यासर्वांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. व्ही. एन. देसाई रुग्णालयात ८ गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कांदिवली शताब्दी रुग्णालयात १३ गोविंदावर उपचार करून त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातुन देण्यात आली.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !