आमच्या वेळी आंदोलन करणारे समाजसेवक आता कुठे गेले? -अजित पवार


परभणी - जिंतूर दि. २२ ऑगस्ट - माहिती अधिकाराचा कायदा कडक करा म्हणून अनेक समाजसेवक ओरडत होते... आंदोलन करत होते आणि आज भाजपाने माहिती अधिकार कायदा संपवला असताना आमच्या वेळी आंदोलन करणारे समाजसेवक आता कुठे गेले? यांची दातखिळी बसलीय का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी जिंतूरच्या जाहीर सभेत केला. महादेवासारखा तिसरा डोळा उघडून या सरकारला आपल्याला घालवण्याची गरज आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

निवडणुका जवळ येत आहेत. ३७० चा मुद्दा इथे काढतील. तो मुद्दा जम्मू आणि काश्मीरचा आहे. त्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही भाजप सरकारला पाच वर्षांत काय केले हे विचारा असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले. राज्यकर्ते सत्तेत मश्गुल झाले आहेत. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. तीन- तीन वर्षे कर्जमाफी यांच्या काकाने केली होती माझ्या काकांने एका फटक्यात दिली होती असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

आमची सत्ता द्या. पहिल्या तीन महिन्यात सातबारा कोरा नाही केला तर नाव सांगणार नाही असे जाहीर आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले. शिवस्वराज्य यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसभेत जे केले ते विधानसभेत करु नका असे आवाहन परभणीतील जनतेला अजितदादा पवार यांनी केले. शेतकऱ्यांचा कैवारी फक्त शरद पवारसाहेब हे लक्षात घ्या. संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढू आणि महाराष्ट्र उभा करु असेही अजितदादा पवार म्हणाले.

जनता यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही - धनंजय मुंडे 
भाजपवाले कितीही नीच पातळीवर भ्रष्टाचार करु देत परंतु या शाहु फुले आंबेडकरांच्या विचारातील महाराष्ट्रातील जनता यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. हे कसलं शिवशाहीचं राज्य... शिवशाहीचं नाव घेवून शेतकऱ्यांनाच कलम करण्याचं काम भाजप सरकार करतंय असेही धनंजय मुंडे म्हणाले.  पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भाजप महाराष्ट्रात जिंकू शकत नाही हा आत्मविश्वास नाही म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते फोडत आहेत असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. आज दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती मराठवाड्यात आहे मात्र हे कृत्रिम पाऊस पाडायला निघाले आहेत. याच्या फवारणीने आलेले ढगच गायब झाले आहेत असे हे देवेंद्राचे सरकार असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.  सरकारकडे भीक मागायची नाही तर या सरकारला घालवल्याशिवाय गप्प बसायचं नाही असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.